विशिष्ट कंत्राटदारासाठी अट घातल्याचा भाजपचा आरोप

मुंबई : पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याकरिता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून एक बोगदा खणण्यात येणार असून या बोगद्याच्या कामासाठी पालिकेची निविदा प्रक्रिया सुरू आहे. मात्र या निविदेमध्ये कंत्राटदाराकडे भारतातील शहरी भागामध्ये बोगदा खणण्याचा पूर्वानुभव असण्याची अट घालण्यात आली आहे. मात्र ही अट विशिष्ट कंत्राटदाराला काम देण्यासाठी घातली असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.

पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगल परिसराखालून १४ मीटर व्यासाचा बोगदा खोदणे व १३ मीटर व्यासाचा बोगदा मार्ग तयार करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. कंत्राटदाराकडे भारतातील शहरी भागामध्ये बोगदा खोदण्याचा पूर्वानुभव असणे आवश्यक आहे, अशी अट या निविदेत घालण्यात आली असून त्यावर भाजपच्या सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. हा बोगदा जंगलाखालून जात आहे. त्यामुळे शहरी भागातील पूर्वानुभव कशासाठी व कुणासाठी मागितला आहे, असा सवाल भाजपचे सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी विचारला आहे. त्यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र लिहून या निविदेत आवश्यक बदल करावेत व निविदा स्पर्धा निकोप व पारदर्शक करावी, अशी मागणीही के ली आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याच्या प्रकल्पांतर्गत गोरेगाव ते मुलुंडदरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून बोगदा काढण्यात येणार आहे. या बोगद्याकडे जाणारा रस्ता हा गोरेगावच्या चित्रनगरीतून जाणारा आहे. या रस्त्यामुळे चित्रनगरीचे दोन भाग होणार आहेत. हे विभाजन टाळण्यासाठी चित्रनगरीतून जाणारा रस्ताही बोगद्याच्या स्वरूपात बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पात चित्रनगरी ते मुलुंड अमरनगरपर्यंत एकूण १२०० मीटरचा बोगदा काढण्यात येणार आहे. हा बोगदा दुहेरी असून आपत्कालीन व्यवस्थेकरिता ३०० मीटर अंतरावर छेदमार्गाने हे दोन्ही बोगदे जोडावे लागणार आहेत.

इतर दुरुस्तीची कामे

  • गोरेगाव-मुलुंड लिंक रोड हा एकूण १२.२ किमी. आहे. यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ४.७ किमी.चा बोगदा काढण्यात येणार आहे. तर चित्रनगरीतून १.६ किमी.चा बोगदा काढणार आहे.
  • गोरेगाव चित्रनगरीमधून मुख्य बोगद्याकडे जाणाऱ्या १७०० मीटर लांबीच्या रस्त्यापैकी सुमारे १२०० मीटर लांबीचा रस्ता हा बोगद्याच्या स्वरूपात बांधण्यात येणार आहे.
  • बोगद्यात आपत्कालीन व्यवस्थेसाठी ३०० मीटर अंतरावर दोन्ही बोगदे जोडले जाणार आहेत.
  • या वर्षीच्या अर्थसंकल्पात आयुक्तांनी प्रकल्पासाठी १३०० कोटींची तरतूद के ली आहे.
  • सध्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोडची रुंदी २४ मीटर असून भविष्यात भुयारी मार्गाच्या बांधकामांमुळे या रस्त्यांची रुंदी २७.४५ मीटर असणार आहे.