हिंदु विधीज्ञ परिषदचे राष्ट्रीय सरचिटणीस संजीव पुनाळेकर आणि आरटीआय कार्यकर्ते विक्रम भावे या दोघांच्या अटकेचा सनातन संस्थेने निषेध केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात दोघांना सीबीआयने अटक केली आहे. हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे आणि आरोपींना मदत करण्याचा दोघांवर आरोप आहे.

हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर असताना संजीव पुनाळकेर आणि विक्रम भावे या दोघांना अटक होण्यामागे कारस्थान आहे. दोघेही निर्दोष असून त्यांचे निर्दोषत्व कोर्टात सिद्ध होईल असे सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनीसांगितले.पुरोगाम्यांच्या मागणीसमोर सीबीआय झुकले असा आरोप सनातनने केला आहे. मालेगाव बॉम्बस्फोटामागचा खोटेपणा, असत्य संजीव पुनाळेकरांनी सिद्ध केले होते. त्यांना अटक होणे ही गंभीर बाब आहे.

कुठल्याही अपेक्षेशिवाय संजीव पुनाळेकर समाज, देश आणि धर्माची सेवा करतात. ते निर्दोष आहेत असे सनातनने म्हटले आहे. संजीव पुनाळकेर यांनी दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींचे वकिलपत्र घेतले होते. संजीव पुनाळेकर यांच्यावर दाभोळकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करण्याचे आरोप आहेत. शरद कळसकरच्या जबाबानंतर दोघांना अटक करण्यात आली. दोघांनाही उद्या सुट्टीकालीन कोर्टात हजर करण्यात येणार आहे.