लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली काँग्रेसच्या पराभवाची मालिका अजूनही खंडित झालेली नसून, मतदारांचा गमावलेला विश्वास पुन्हा प्राप्त करण्यात काँग्रेसची नेतेमंडळी अद्यापही यशस्वी झालेली नाहीत. केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात नाराजी वाढत असून, त्याचा फायदा होईल ही काँग्रेसची अटकळ वांद्रे पोटनिवडणुकीतही फोलच ठरली. त्यामुळे पुढील आठवडय़ात होणाऱ्या नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे राहणार, हे स्पष्ट आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यापाठोपाठ महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड, जम्मू व काश्मीर तसेच दिल्ली या राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा सफाया झाला. जनतेमध्ये काँग्रेसबद्दल असलेली नाराजी अजूनही दूर झालेली नाही. वांद्रे पूर्व या एकाच मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरून अंदाज बांधणे चुकीचे असले तरी काँग्रेस आणि मतदारांमध्ये निर्माण झालेले अंतर अद्यापही कायम आहे. ही दरी दूर करण्याचे पक्षाकडून प्रयत्न होत असले तरी त्याला यश येताना दिसत नाही.

अल्पसंख्याक अजूनही काँग्रेसच्या विरोधात?
वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणूक ही नारायण राणे यांच्याभोवती केंद्रित होती. राणे विरुद्ध शिवसेना असा हा सामना होता. हा राणे यांचा पराभव असला तरी एमआयएमला मिळालेली १५ हजार मते ही मुख्यत्वे काँग्रेसविरोधी असल्याचे मानले जाते. अल्पसंख्याक समाजात अजूनही काँग्रेसबद्दल तेवढी आपुलकीची भावना नाही हाच संदेश या निकालातून स्पष्ट झाला आहे. गोवंश हत्याबंदी, गोमांस विक्रीवरील बंदी यावरून काँग्रेसने अल्पसंख्याकांच्या मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच एमआयएमला मत म्हणजे शिवसेनेला मदत हा काँग्रेसचा प्रचार अल्पसंख्याकबहुल विभागांमध्ये तेवढा पचनी पडलेला नाही. भूसंपादन विधेयकावरून काँग्रेसने मोदी सरकारच्या विरोधात वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राज्यात फडणवीस सरकार म्हणजे घोषणाबाज सरकार अशी टीका काँग्रेसकडून केली जाते. जनतेच्या मनात भाजप सरकारच्या विरोधात वातावरणनिर्मिती करण्यात येत आहे; पण मतदारांच्या मानसिकतेत फरक पडलेला नाही हेच सिद्ध होते. पक्षाचा उभारी घेण्याचा प्रयत्न असला तरी राहुल गांधी गेले दोन महिने गायब असण्याचा मुद्दा काँग्रेसला महागात पडला आहे.

नवी मुंबई, औरंगाबादमध्ये निभाव लागणार?
अशोक चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पक्षाची कामगिरी सुधारण्यावर भर दिला, पण चव्हाण यांच्या निवडीनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. पुढील आठवडय़ात होणाऱ्या नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका, कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ, भोकर आदी नगरपालिकांची निवडणूक आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. नवी मुंबईत पक्षाला फार काही यशाची अपेक्षा नाही. वांद्रे पूर्वचा कौल लक्षात घेता अल्पसंख्याक मतदार अजूनही एमआयएमच्या मागे आहेत हे चित्र आहे. औरंगाबादमध्ये विधानसभेचाच कल कायम राहिल्यास काँग्रेसचा निभाव लागणे कठीण जाण्याची चिन्हे आहेत. पत्नी अमिता या निवडून आलेल्या भोकर नगरपालिकेची निवडणूक जिंकणे हे अशोक चव्हाण यांच्यासाठी मोठे आव्हान आहे.