नवरात्रोत्सवावर करोनाचे सावट

मुंबई : ध्वनिप्रदूषणामुळे वेळेचे बंधन येऊनही मुंबईतील गरब्याचे महत्त्व कमी झाले नव्हते.परंतु, यंदा करोनामुळे प्रथमच नवरात्रोत्सव गरब्याविना पार पडणार आहे.

मुंबईत गुजरातीबहुल भागात मोठ्या स्तरावर होणाऱ्या गरब्याच्या आयोजनाचे मोठे अर्थकारण आहे. हजारो रुपये खर्च करून नृत्यप्रेमी गरबा खेळायला जातात. परंतु करोनामुळे अंतर नियम, मुखपट्टी आदी बंधनांमुळे गरब्याचा बेरंग होणार आहे. आयोजकांनाही याची जाणीव असल्याने कोणीही आयोजनात स्वारस्य घेतलेले दिसत नाही.

नवरात्रोत्सवाला अजून ४० दिवस आहेत. मात्र आयोजकांच्या स्तरावर शांतता आहे. दरवर्षी या काळात नियोजन सुरू होते. यंदा मात्र सर्वत्र शुकशुकाट आहे. बोरीवलीतील लोकप्रिय कोरा केंद्र येथे नऊ दिवसांत अंदाजे दोन ते अडीच लाख लोक गरबा खेळण्यासाठी येतात. नऊ दिवसांचे एकत्रित तीन हजार, प्रतिदिन ५०० ते ७०० तर सुट्टीच्या दिवशी ९०० ते १००० रुपये असे तिकीट दर असतात. गरबा यशस्वी करण्यासाठी साधारण महिनाभर आधीपासून आयोजक तयारीला लागलेले असतात. मैदानाची मशागत, प्रकाशयोजना, ध्वनिसंयोजन, मोठमोठ्या गायकांशी बोलणी असा मोठा तामझाम असतो. परंतु यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर गरबा होणार नसल्याचे कोरा केंद्र गरब्याचे प्रतिनिधी तेजन बोटाद्रा यांनी सांगितले. ‘गरबा व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु अद्याप करोनाचे सावट निवळले नसल्याने हजारोंची गर्दी करून चालणार नाही. उत्सवामुळे माणसांच्या जिवाला धोका निर्माण होता कामा नये. गरबा रद्द होणार असला तरीही मूर्तिपूजेसंदर्भात सप्टेंबर अखेरपर्यंत सरकारी निर्णयाची वाट पाहू,’ असे ते म्हणाले. अंधेरी, गोरेगाव, बोरीवली या परिसरातील आयोजकांची थोड्याअधिक फरकाने हीच प्रतिक्रि या आहे.

नऊ दिवस विविध कार्यक्रम घेण्याकडे बहुतांशी मंडळाचा कल असल्याने मंडळाचेही डोळे शासन निर्णयाकडे आहेत. तसेच स्थानिक मंडळांमध्येही गरबा, दांडियाचे आयोजन केले जाते. परंतु यंदा तिथेही साधेपणाने उत्सव करण्याकडे कल आहे.

ठाण्यात नवरात्रोत्सव साधेपणात

ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानचा नवरात्रोत्सव विशेष ओळखला जातो. मूर्तिपूजन, धार्मिक विधी याशिवाय रासदांडियाचे आयोजन असा भव्य समारोह असतो. इथले आयोजक आणि अभिनेते सुशांत शेलार सांगतात, ‘नऊ दिवस लोकांना मनसोक्त दांडिया खेळता यावा यासाठी आम्ही एकही रुपया आकारात नाही. त्यामुळे ठाणेच नाही तर मुलुंड, डोंबिवली, कल्याण अशा विविध ठिकाणांहून तरुणाई येते. यंदा करोनामुळे अशी गर्दी जमवणे गैर आहे. शिवाय आतापर्यंतचा कोणताही उत्सव दिमाखात झाला नसल्याने नवरात्रोत्सवही साधेपणानेच होईल.’