अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मुंबई आणि परिसरात पाच ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये एका प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याच्या घराची झाडाझडती घेण्यात येत असून एका ड्रग विक्रेत्याला ताब्यातही घेण्यात आलं आहे. सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात समोर आलेल्या बॉलिवूडमधील ड्रग्ज अँगलनंतर एनसीबीने सुरु केलेली कारवाई अद्यापही सुरुच आहे.

एएनआयच्या माहितीनुसार, एनसीबीनं अंधेरी, खारघर येथे ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी धाड टाकली होती. यामध्ये एका ड्रग्ज विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आजही एनसीबीने पाच ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. यामध्ये मालाड, अंधेरी, लोखंडवाला, खारघर आणि कोपरखैराणे या भागांचा समावेश आहे.

फ्री प्रेस जनरलच्या वृत्तानुसार, एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, “आम्ही ६ किलो मारिओना आणि मेफेड्रोन हे ड्रग्ज जप्त केले आहेत. ड्रग्ज विक्रेत्यांकडून हे जप्त करण्यात आलं आहे. यामध्ये पाच संशयीत ड्रग्ज विक्रेत्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.”

बॉलिवूडमधील ड्रग्जप्रकरणी एनसीबीनं अत्तापर्यंत अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींची चौकशी केली आहे. यामध्ये श्रद्धा कपूर, दिपीका पदुकोन, रकूलप्रीत सिंग, सारा अली खान यांचा समावेश आहे. ड्रग्ज पुरवठ्याप्रकरणी यांची चर्चा झाल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यावरुन त्यांना एनसीबीनं आपल्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं होतं.