काँग्रेस-राष्ट्रवादीची टीका

राजकीय फायद्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही थराला चालले असल्याचे मनसेने काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयावर केलेल्या हल्ल्यातून दिसून येते अशी टीका काँग्रेस व राष्ट्रवादीने केला आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे पुरते बारा वाजले असून मुख्यमंत्री गुंडगिरीला मनसे साथ देत असल्याचा आरोपही काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. एरवी किरकोळ बाबतीतही ‘ट्विट्वि’ करणारे मुख्यमंत्री मुंबईत काँग्रेसच्या कार्यालयावर मनसेच्या गुंडांनी हल्ला करूनही गप्प का, असा सवाल काँग्रेसने केला आहे.

आझाद मैदान येथील काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करून शुक्रवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. याप्रकरणी मनसेच्या आठ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने सोमवापर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तथापि काँग्रेस व मनसेमधील वाद विकोपाला गेला असून या हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना बांगडय़ा भेट म्हणून पाठवून दिल्या. कार्यालयात कोणीही नसताना केलेला हा भ्याड हल्ला असून, हल्ला करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांच्या समर्थनाशिवाय कशी होऊ शकले, असा सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कायदा व सुव्यवस्थेवर कोणतेही नियंत्रण राहिले नाही, असे सांगत गुंड पाळण्याची किंमत आज काँग्रेस पक्षाला मोजावी लागत आहे उद्या असा प्रकार अन्य पक्षांच्या बाबतीतही होऊ शकतो अशी अस्वस्थता काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी मोठय़ा प्रमाणात भाजपने गुंडांची भरती केली. या गुंडांना वाल्या असे गोंडस नाव देऊन भाजपमध्ये प्रवेश देऊन वाल्मिकी करण्याचे उद्योग मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी केले. आता मनसेच्या गुंडानाही साथ देण्याचे काम होत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. अशा प्रकारे राजकीय पक्षाच्या कार्यालयावर हल्ला करणे चुकीचे असून मुख्यमंत्री गुंडगिरीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. मनसेने फेरीवाला आंदोलन करून जी काही थोडीफार सहानुभूती मिळवली होती ती या हल्ल्याने गमावल्याचे मुंडे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे रोजच्या रोज धिंडवडे निघत असून आता मुंबईतही मनेसेच्या गुंडगिरीला आळा घालण्याऐवजी प्रोत्साहन देऊन राजकीय फायद्यासाठी वातावरण तापविण्याचे काम होत असल्याचे संजय निरुपम यांनी सांगितले.

या हल्ल्याप्रकरणी मनसेचे संदीप देशपांडे, संतोष धुरी, अभय मालप, योगेश छिल्ले, विशाल कोकणे, हरिश साळुंखे, संतोष सरोदे, दिवाकर पडवळ यांना किल्ला कोर्टाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.