राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीने बाजी मारली असून सत्ताधारी भाजप- शिवसेनेला धक्का बसला आहे.

मुंबई, उल्हासनगरसह नाशिक, सोलापूर, पुणे, अहमदनगर आणि जळगाव महापालिकेच्या सात प्रभागांमध्ये, तसेच पंचायत समितीच्या १२ गण आणि जिल्हा परिषदेच्या दोन गटांच्या पोटनिवडणुकांचे निकाल शनिवारी घोषित झाले. एकूण २१ जागांपैकी राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या आघाडीला सर्वाधिक ११ जागा मिळाल्या असून त्यात राष्ट्रवादीला सहा तर काँग्रेसला पाच जागा मिळाल्या. तर भाजप व शिवसेना युतीच्या वाटय़ाला केवळ सात जागा आल्या असून त्यात भाजपला पाच तर शिवसेनेला दोन जागांवर समाधान मानावे लागले.  नाशिकमधून मनसेने व कुडाळमधून खासदार नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने तसेच धुळ्यातून अपक्षाने प्रत्येकी एकेक जागा जिंकली असून शिवसेनेला अनेक ठिकाणी फटका बसला आहे. पुणे आणि उल्हासनगर महापालिकेतील जागा राष्ट्रवादीने तर सोलापूर आणि अहमदनगरच्या जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. जळगाव महापालिकेत भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला असून मुंबईतील जागा शिवसेनेने तर नाशिकची जागा मनसेने कायम राखली आहे. पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीत हिंगणघाट, सडक अर्जुनी, तुळजापूर, वैजापूर या जागा राष्ट्रवादीने तर आरमोरी, बिलोली चंद्रपूरच्या जागा काँग्रेसनेजिंकल्या आहेत. धुळे, लोहा, साक्री या तीन ठिकाणी भाजपचे तर गंगापूरमध्ये सेनेचा उमेदवार विजयी झाला आहे.