भाजपच्या भीतीने काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते एकत्र; आता उर्वरित दोन टप्प्यांमध्ये यात्रांचे नियोजन

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह साऱ्या विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या निमित्ताने विरोधी नेते एकत्र आले असले तरी या यात्रेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच प्रभाव राहिला. आता दोन टप्प्प्यांमध्ये उर्वरित भागांमध्ये संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेश तसेच राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये साहजिकच अस्वस्थता पसरली. शिवसेनेने घेतलेल्या विरोधी भूमिकेमुळे भाजपच्या गोटातून मध्यावधी निवडणुकांची हूल देण्यात आली. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अधिकच चिंता निर्माण झाली. गुजरातबरोबर राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्यास आपले भवितव्य काय, असा विरोधकांना प्रश्न पडला. कर्जमाफीच्या मुद्दय़ावरून आक्रमक भूमिका घेण्यात आली असतानाच अर्थसंकल्पाच्या वेळी गोंधळ घातल्याने १९ आमदारांना निलंबित करण्यात आले. त्यातून आपण आता थेट जनतेत गेले पाहिजे, अशी भूमिका सुनील केदार, जितेंद्र आव्हाड आदी तरुण आमदारांनी मांडली.  कोणतेही नियोजन नसताना संघर्ष यात्रा काढण्याचा घाईघाईत निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला नेतेमंडळी यात्रेला प्रतिसाद मिळेल का, याबाबत साशंक होती. पण तरुण आमदारांच्या मागणीनंतर यात्रा काढण्यावर एकमत झाले.

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात काढण्यात आलेल्या यात्रेत काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, जनता दल (से), समाजवादी पार्टी आदी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. विदर्भात ४० अंश सेल्सियसपेक्षा जास्त पारा असताना नेतेमंडळी जनतेत मिसळली. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात यात्रेवर आपला प्रभाव राहिल याची खबरदारी राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली होती. सभेच्या ठिकाणी राष्ट्रवादीला महत्त्व मिळेल यावर कटाक्ष ठेवण्यात आला होता.

काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे संपूर्ण सात दिवस यात्रेत सहभागी झाले होते. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे सुरुवातीला आणि सांगता झाली तेव्हा उपस्थित होते. राष्ट्रवादीने यात्रेवर आपला प्रभाव राहिल याची ज्या पद्धतीने काळजी घेतली तसे प्रयत्न काँग्रेसकडून झाले नाहीत. यात्रेची सांगता पनवेलमध्ये झाली. त्या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते. यामुळे प्रसिद्धीचा सारा रोख हा राष्ट्रवादीकडे गेला. या यात्रेचा राष्ट्रवादीप्रमाणे आम्हाला राजकीय लाभ उठविता आला नाही, असी कबुली काँग्रेसच्या एका नेत्याने दिली.

यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते अधिक जवळ आले. पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार बसमध्ये शेजारीशेजारी बसले. गेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाने निर्माण झालेली कटुता कमी झाली.

आणखी दोन टप्प्यांमध्ये यात्रा

पहिल्या टप्प्यात विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये यात्रा निघाली. आता १५ एप्रिल नंतर दुसऱ्या टप्प्यात यात्रा काढण्यात येणार आहे. बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथून ही यात्रा निघेल. तिसऱ्या टप्प्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर अशी यात्रा काढण्यात येणार आहे.