महिलांसाठी स्वतंत्र बँक, देशातील ४० टक्के बँकांचा कारभार महिलांकडे या पाश्र्वभूमीवर संसद आणि विधिमंडळांमध्ये महिलांसाठी आरक्षण लागू करण्याची मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिला मतदारांची मते जिंकण्याचा गुरुवारी प्रयत्न केला. या विधेयकाला विरोध करणाऱ्यांना आगामी निवडणुकीत महिलांनी मते देऊ नये, असे आवाहन केले जाईल. या पक्षांना महिलाच धडा शिकवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलताना पवार यांनी गेले अनेक वर्षे रखडलेल्या महिला आरक्षणाच्या मुद्दय़ाला स्पर्श केला. दोनच दिवसांपूर्वी मुंबईत महिला बँकेचे उद्घाटन झाले. हा कार्यक्रम संपवून नवी दिल्लीत परतताना संसद आणि विधिमंडळातील महिला आरक्षणाच्या कायद्याबाबत आपण पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. १५व्या लोकसभेच्या अखेरच्या अधिवेशनात म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात या संदर्भातील विधेयक मंजुरीसाठी चर्चेला घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यासाठी राजकीय पक्षांमध्ये सहमती करावी लागेल. संसद आणि विधिमंडळात महिलांसाठी आरक्षण लागू करण्यास विरोध करणारे कोण आहेत हे यातून पुढे येईल. त्यांना महिलांनी मते देऊ नये, असे आवाहन आगामी निवडणुकीत केले जाईल, असेही पवार म्हणाले. महिला आरक्षणाचा मुद्दा मांडून पवार यांनी महिला मतदारांची मते जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास त्याचे श्रेय मिळेल याची तजवीज पवार यांनी करून ठेवल्याचे मानले जाते. महिला आरक्षणासाठी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी अनुकूल असल्या तरी पक्षातील काही नेतेमंडळींचा त्याला विरोध आहे. याशिवाय मुलायमसिंग यादव, लालूप्रसाद यादव आदींचाही विरोध आहे. पवार यांनी मागणी केल्याने महिला आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वतीने महिलांना प्राधान्याने उमेदवारी दिली जाईल, असे आश्वासनही पवार यांनी दिले.
अजितदादांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक फाईल अनेक दिवस सापडत नसल्याने गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तीव्र नापसंती व्यक्त करीत जाब विचारला. त्यानंतर लगेचच ही फाईल सापडली. आता आर. आर. आबांना कळले असेल की, दादा का चिडतात, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हलकेच मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला.

अस्वस्थ वाटू लागल्याने पवारांची वैद्यकीय तपासणी
युवती काँग्रेसच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी शरद पवार हे सकाळी लवकरच कार्यक्रमस्थळी आले होते. कार्यालयात बसले असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या. रक्तदाब वाढल्याने पवार यांना अस्वस्थ वाटू लागले होते. थोडय़ा वेळाने सर्व चाचण्या पार पडताच कन्या सुप्रिया सुळे यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याच्या ठिकाणी पवार परतले आणि त्यांनी बसूनच भाषण केले.