राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर, आज (रविवार) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी पक्षाच्या नेत्यांकडून येत्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीला जादा जागा मिळाव्यात, अशी महत्वपूर्ण मागणी करण्यात आली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल बघता राज्यातील जागावाटपाच्या सुत्रात बदल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमुखाने केली. त्यानुसार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि नेते प्रफुल्ल पटेल काँग्रेसशी येत्या काही दिवसांत जागावाटपाबाबत चर्चा करणार असल्याचे समजते.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबद्दल पक्षाच्या नेत्यांमध्ये असलेल्या नाराजीचा मुद्दा या बैठकीत पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एलबीटी, मराठा आरक्षण आणि मुस्लिम आरक्षण यांसारख्या मुद्द्यांवर तातडीने निर्णय घेण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.