मुंबईमधल्या चेंबूरमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाची एसआयटी अर्थात विशेष तपास पथकातर्फे चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांच्या नेतृत्त्वात मुंबईतल्या चुनाभट्टी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान पोलिसांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आली.

काय म्हटल्या आहेत सुप्रिया सुळे?
” माणुसकीच्या नात्याने आम्ही पीडित कुटुंबीयांच्या पाठिशी उभे आहोत. या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकातर्फे झाली पाहिजे. राज्यात अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना घडत आहेत. गृहखात्याचं काम दुर्दैवी आहे. गृहखातं मुख्यमंत्र्यांकडेच आहे. त्यांना कायदा सुव्यवस्था राखणं जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा”

तर चेंबूरमधल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावरुन नवाब मलिक यांनीही टीका केली आहे. ”चेंबूर येथील सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलीस यंत्रणेचं अक्षम्य दुर्लक्ष झालं आहे. सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे तसंच चौकशीसाठी एसआयटी नेमावी” असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान चेंबूरमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी नकार दिला आहे. याप्रकरणी जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी घेतली आहे.