मराठा आरक्षणासंदर्भात आज महत्वपूर्ण दिवस आहे. गुरुवारी सकाळी विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन सरकारला धारेवर धरले. सरकारने आरक्षणावर स्पष्ट भूमिका मांडावी. किती टक्के आरक्षण मिळणार हे कधी सांगणार. सरकारची ही लपवाछपवी कशासाठी ? असा प्रश्न त्यांनी विचारला.

मुस्लिम समाजाच्याही काही मागण्या आहेत त्याला सरकार स्पर्श करत नाही. उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सरकारने स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे असे अजित पवार म्हणाले. मराठा आरक्षण विधेयक मांडले जावे ते कोर्टात टिकले पाहिजे. इतर कोणाचीही त्यामुळे अडचण होता कामा नये असे अजित पवार म्हणाले.

व्हॉटसअॅपवर मेसेज फिरत आहेत. जल्लोष करा, मुख्यमंत्र्यांचे बॅनर लावा असे त्या संदेशांमध्ये म्हटले आहे. मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे निघाले. ४० मुलांनी जीवन संपवले आणि तुम्ही जल्लोष करायला सांगत आहात अशी टीका त्यांनी सरकारवर केली. आम्ही मराठा समाजाला आणि मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण दिले. त्यावेळी आम्ही असा जल्लोष केला नाही. ती आमची जबाबदारी होती. यात राजकारण करण्याचा सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न आहे का ? त्याचं उत्तर मिळालं पाहिजे अशी मागणी अजित पवार यांनी केली.