सरकारी प्रकल्प जाहीर झालेल्या गावातील जमिनी कवडीमोल दराने विकत घ्यायच्या आणि सरकारला त्या वाढीव किंमतीला विकण्याचा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचा धंदा असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला. वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी रावल आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर ३०२ प्रमाणे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली.

मागील १० ते १५ वर्षांपासून रावल कुटुंबीय धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करत असून पैसे कमावण्याचा सोपा मार्ग त्यांनी अवलंबल्याचे त्यांनी म्हटले. रावळ कुटुंबाचे रॅकेटच यासाठी कार्यरत आहे. धुळे जिल्ह्यातील अनेक जमिनी या जयकुमार रावल किंवा त्यांच्या कंपनीच्या नावे आहेत. आजही त्या जागांचे ७/१२ उतारे व फेरफार दाखले पाहिल्यास त्याची नोंद आढळून येते. धर्मा पाटील यांच्या जागेबाबत बैठक ठरली होती. पण रावल यांच्या सांगण्यावरून बावनकुळे यांनी ही बैठक रद्द केली. यांच्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दोघांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना केली.

रावल आणि बावनकुळे यांनी धर्मा पाटील यांची जमीन लाटण्यासाठी मोबदल्याचे काम होऊ दिले नसल्याचे समजते. रावल यांच्यावर यापूर्वीही अशाप्रकारचे आरोप आहेत व त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती मलिक यांनी दिली. कायद्याप्रमाणे शेतकऱ्यांना जमिनीच्या चारपट मोबदला मिळायला हवा. त्यामुळेच शेतकरी मोबदला वाढवून देण्याची मागणी करत होते. यातली बरीचशी जमीन रावल कुटुंबीयांनी विकत घेतली होती. मोबदल्याचा निर्णय त्यांनी राखून ठेवला जेणेकरून आणखी जमीन खरेदी करता यावी. त्यामुळे जयकुमार रावल यांच्यावर तातडीने मनुष्यवधाच्या आरोपाखाली ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करून यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

एकनाथ खडसे यांनीही असेच केले होते. त्यांना राजीनामा द्यावा लागला. पण या प्रकरणात आत्महत्या झाली आहे. त्यामुळे रावल आणि बावनकुळे यांनी राजीनामा द्यायलाच हवा, नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभरात तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, भूसंपादन केलेल्या जमिनीच्या मोबदल्याच्या प्रश्नावरून ८४ वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनी आठवड्यापूर्वी मंत्रालय परिसरात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांचे अखेर रविवारी रात्री ११ च्या सुमारास निधन झाले. त्यानंतर राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत.