मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी पक्षाचे नेते, पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. राज्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे सांगितले जात असले तरी, लोकसभा निवडणुकीतील मतदानानंतर राजकीय परिस्थितीचाही आढावा घेतला जाणार असल्याचे समजते.

विदर्भ, मराठवाडा, खानदेशात दुष्काळी स्थिती फारच गंभीर आहे. दुष्काळी परिस्थती हातळण्यासाठी निवडणूक आचारसंहितेचा अडसर निर्माण होत असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे. त्याबद्दल राज्य शासनाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून आचरसंहिता शिथिल करण्याची मागणी केली आहे. मात्र आचारसंहितेचे नाव पुढे करून दुष्काळ निवारण्याच्या कामात राज्य सरकार हयगय करीत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना केली. दुष्काळ डिसेंबरमध्ये जाहीर केला आहे, त्यानंतर निवडणुका जाहीर झाल्या आहेत. दुष्काळ निवारण्याच्या कामात आचारसंहितेचा अडसर येत नाही, सरकार केवळ वेळकाढूपणा करीत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्या होणाऱ्या बैठकीत प्रामुख्याने राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली. पवार यांच्या उपस्थिती होणाऱ्या या बैठकीला पक्षाचे सर्व प्रमुख नेते, जिल्हा अध्यक्ष व अन्य महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, असे त्यांनी सांगितले. बैठकीला लोकसभा निवडणुकीतील पक्षाचे सर्व उमेदवारही हजर राहणार आहेत. या निवडणुकीत पक्षाची काय कामगिरी राहील, याचा आढावा घेतला जाणार आहे.