राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत वाढत्या घरगुती हिंसाचाराच्या घटनांवर चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी कौटुंबिक हिंसाचार करणं ही कौतुकाची किंवा मर्दानगीची गोष्ट नसल्याचं सांगताना आपल्यावर छत्रपतींचे संस्कार आहेत हे विसरु नका याची आठवण करुन दिली. तसंच कौटुंबिक हिंसाचार रोखणं ही फक्त महिलेची जबाबदारी नसून पुरुषाची जास्त आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना या काळात घरगुती हिंसाचाराच्या घटनांची शक्यता घेता पुणे जिल्हा परिषदेने केलेल्या उपाययोजनांचे कौतुक केलं. “घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये सुमारे १५०० कमिटीज स्थापन झाल्या आहेत. यामध्ये सुमारे १२ हजार महिला सहभागी झाल्या आहेत. या महिलांचे व्हॉटस्अप ग्रुप आहेत.एखाद्या घरात घरगुती हिंसाचाराची घटना घडल्याचे लक्षात आले की या महिला त्यावर योग्य ती उपाययोजना करतात,” अशी माहिती दिली.

“घरगुती हिंसाचाराच्या मुद्द्यावर मी गेले काही दिवस मानसशास्त्राचे अभ्यासक, समाजशास्त्रज्ञ यांच्याशी बोलत आहे. आनंद नाडकर्णी यांनी याबाबत सांगितलंय की, हा तणावाचा काळ आहे आणि त्याचीच ही परिणती असू शकते. अशावेळी दोन मार्ग आहे. एकतर तुम्ही त्याचा प्रतिकार करु शकता किंवा तुम्ही शांत राहता. अर्थात हा निर्णय परिस्थिती आणि घटनेच्या गांभीर्यानुसार प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळा असू शकतो. त्याचे सरसकटीकरण करता येणे शक्य नाही,” असं सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं.

सुप्रिया सुळे यांनी यावेळी कौटुंबिक हिंसाचारावर बोलताना सांगितलं की, “सध्या करोनामुळे सगळेच जण त्रस्त असून त्यांना चिंता सतावत आहे. भांडण हे नात्यातून वेगळं काढण्याची गरज आहे. एक तर शब्दाला शब्द वाढवून वाढवू शकता किंवा त्या वेळेला शांत बसून आपण तो क्षण जाऊ देऊ शकतो. ठाम राहणे, जाऊ देणे, आक्रमक होणे किंवा मग त्या क्षणी शांत राहून नंतर त्यावर मात करणे असे अनेक पर्याय आपल्याकडे आहेत”.

आणखी वाचा- “फेसबुकमधून बाहेर या आणि फिल्डवर जा…”, म्हणणाऱ्याला सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर

“नवीन कायदे करण्याची ही वेळ नाही. घरगुती हिंसाचारावर आधीच कायदे आहेत. प्रकरण हाताबाहेर गेलं तर पोलीस ठाण्यात जाण्याशिवाय पर्याय नाही. पण समुपदेशन करणं हादेखील चांगला पर्याय आहे,” असं सुप्रिया सुळे यांनी यावेळी सुचवलं.

“हे प्रकार ग्रामीणपेक्षा शहरी भागात जास्त आहेत असं डेटा सांगतो. कदाचित आर्थिक,सामाजिक व इतर ताण ही त्याची कारणे असू शकतील. यावर आपणा सर्वांनी मार्ग काढायला हवा. डेटा सांगतोय की, करोनाची ही स्थिती संपल्यानंतर कदाचित बेरोजगारीचे प्रमाण वाढू शकते. या परिस्थितीचा सर्वात मोठा फटका महिलांना बसणार आहे. घर चालवताना त्यांची तारेवरची कसरत होणार आहे. पण आपण यावर मार्ग काढू शकतो,” असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. महिलेला आधार दिला पाहिजे, कुटुंबात तिचं खूप मोठं योगदान असतं असं आवाहनही यावेळी त्यांनी केलं.