‘‘साहित्यामध्ये नेहमीच समाजाचे प्रतिबिंब उमटत असते. मात्र समाजाची घडण, उत्क्रांती अर्थातच विज्ञानामुळे झाली आहे. मानवाला विचार करण्याची क्षमता निसर्गदत्त असल्यानेच उत्क्रांती झाली. पण त्याला चालना देण्याचे काम विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे मिळाले. विज्ञानाचा प्रभाव जीवनावर पडतो आणि त्यामधून सामाजिक, वैचारिक स्थित्यंतरे होत असतात. त्यामुळे विज्ञानावर आधारलेले साहित्य, विज्ञानाची माहिती, त्या अनुषंगाने येणारे विचार याचा साहित्यामध्ये समावेश असणे गरजेचे आहे,’’ असे विचार प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी मांडले.
परममित्र प्रकाशनाच्या वतीने ‘विज्ञान प्रवाह’ या उपक्रमांतर्गत प्रकाशित करण्यात येणाऱ्या ५० पुस्तकांच्या मालिकेतील चार नव्या पुस्तकांचे प्रकाशन ठाण्यात रविवारी डॉ. काकोडकर यांच्या हस्ते झाले. महापालिक च्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, पीतांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई आणि ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी उपस्थित होते. यावेळी काकोडकर यांनी विज्ञान साहित्याचे महत्त्व विषद केले. ‘‘स्थित्यंतरे वेगात होतात, त्या वेळी समाज गोंधळलेला असतो. त्यावर चर्चा करण्यासाठी त्याविषयीचे साहित्य वेळेवर उपलब्ध होणे गरजेचे आहे. ते समाजमनाच्या स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे,’’ असे काकोडकर यांनी सांगितले.  
विज्ञान-तंत्रज्ञान हे नव्या पिढीपासून दूर ठेवता येणार नाहीत, तर हे तंत्रज्ञान आत्मसात करून जीवन जगण्याची कला पालकांनी मुलांना शिकवली पाहिजे. शिक्षण व्यवस्थेने यावर र्निबध घालून हे थांबवता येणार नाही, तर त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. मुलांच्या शिक्षणासाठी अनेक नवे प्रयोग राबवण्याची गरज आहे. केवळ लेखी परीक्षांकडे भर देऊ नये, तर मुलांना प्रयोग करण्याची संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. कुडाळसारख्या छोटय़ा शहरात ‘वसुंधरा’सारखे चांगले उपक्रम राबवले जात आहेत हे कौतुकास्पद आहे, असेही काकोडकर यांनी सांगितले.

ज्ञानवादी लिखाण होणे गरजेचे
‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी विज्ञान प्रवाहच्या उपक्रमाचे कौतुक केले. ‘‘आपल्याकडील संतांनी अनेक चांगल्या गोष्टींचा उल्लेख ग्रंथांमध्ये केला असला, तरी त्यावर सविस्तर संशोधन होऊन ज्ञानवादी लिखाण होणे गरजेचे होते. सध्या इतिहासाचे विदृपीकरण होत आहे. त्यामुळे खरेपणाचे भान बाळगणे गरजेचे आहे,’’ असे कुबेर यांनी सांगितले. विज्ञान प्रवाह या मालेत फेब्रुवारी २०१४ पर्यंत सुमारे ५० विज्ञानविषयक पुस्तकांचे प्रकाशन होणार असल्याचे परममित्रचे संचालक माधव जोशी यांनी सांगितले.’’