उमाकांत देशपांडे

विधान परिषद निवडणुकीतील पराभवाची भाजप पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली असून मतदार नोंदणीकडे झालेले दुर्लक्ष भाजपला भोवल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तर पुढील निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढविणार, हे गृहीत धरूनच आता भाजपची रणनीती आखणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.

विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या मतांमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत घट झाली आहे. महाविकास आघाडी एकत्रित लढल्याने आणि अन्य उमेदवार प्रबळ नसल्याने मतविभाजन न झाल्याचा फटका बसलाच, पण भाजपबद्दल आपुलकी असलेल्या मतदारांची नोंदणी पुरेशी झाली नाही हेही एक महत्त्वाचे कारण आहे, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

मतदार नोंदणीसाठी मार्च ते जुलैपर्यंतचा कालावधी होता. करोनामुळे भाजप कार्यकर्ते मदतकार्यात होते, पण घरोघरी जाऊन मतदार नोंदणीत कमी पडले. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी पक्षाकडून साधारणपणे ८० हजार ते लाखभर नवीन मतदारांची नोंदणी होते. विधान परिषद निवडणुकीआधी केवळ २० हजारांच्या आसपास ती झाली. मात्र या निवडणुकीत शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत नवीन मतदारांची नोंदणी झाली. त्यात भाजपचे मतदार कमी असल्याने फटका बसला. एकगठ्ठा अर्ज घेता येणार नाहीत, त्या मतदारांनी समक्ष आले पाहिजे, हे कारण देत नागपूरमध्ये १८ हजार अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी नाकारले. मराठवाडय़ातही भाजपकडून मतदार नोंदणी कमी झाल्याने फटका बसला, असे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.

श्रेष्ठींकडे अहवाल

विधान परिषद निवडणुकीत झालेल्या पराभवाबाबत कारणमीमांसा करणारा अहवाल पाठविण्यात येणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा १८-२० डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रात येत असून आगामी निवडणुकांसाठी रणनीती ठरविण्यासाठी त्यांची राज्यातील वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा होणार आहे. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची एकत्रित ताकद जोखण्यात कमी पडल्याची कबुली फडणवीस यांनी दिली आहे. या धक्क्यातून सावरून मुंबईसह काही महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये सत्ता काबीज करण्याच्या दृष्टीने भाजपने डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. मुंबई, नवी मुंबईसह एमएमआरडीए क्षेत्रात शिवसेनेचे प्राबल्य आहे. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जागावाटप करून महाविकास आघाडी एकत्रित लढली, तर त्यांची ताकद आणखी वाढेल. याची जाणीव ठेवून भाजपकडून  रणनीती आखली जाणार आहे.