मुंबई : पावसाळ्यात मरिन ड्राइव्हजवळ थेट रस्त्यावर आदळणाऱ्या लाटांमध्ये भिजण्यासाठी दरवर्षी लाखो मुंबईकर किनाऱ्यावर जमतात. मात्र या लाटांसोबत येणाऱ्या मिठाच्या कणांचा मारा सहन न झाल्याने या रस्त्याच्या दुभाजकावर लावलेली रोपटी माना टाकतात. यावर उपाय म्हणून या रोपटय़ांवर हिरव्या जाळ्या लावण्याचा प्रयोग गेल्यावर्षी करण्यात आला. तो यशस्वी ठरल्यावर यावर्षीही पावसाळ्यापुरत्या या जाळ्या १२० रोपटय़ांवर लावण्यात आल्या आहेत.

समुद्रकिनाऱ्यावरील खारे व जोरदार वारे सहन करण्याची क्षमता काही विशिष्ट झाडांमध्ये असते. त्यामुळे समुद्रकिनारी नारळ, समुद्रफळ अशा प्रकारची झाडे लावली जातात. समुद्रकिनाऱ्याजवळ बागांमध्ये रोपांची निवडही हे लक्षात घेऊन करावी लागते. मात्र मरिन ड्राइव्हवर पोलीस जिमखान्यासमोर लाटा थेट रस्त्यावर आदळतात. अगदी किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटांमधील तुषारही रस्त्यांच्या दुभाजकांवर लावण्यात येणाऱ्या रोपटय़ांपर्यंत जातात. खाऱ्या पाण्यामुळे आणि मिठाच्या कणांच्या माऱ्याने रोपटी तगत नाहीत. त्यामुळे या संपूर्ण रस्त्यावर केवळ या एका भागातील दुभाजक पावसाळ्यात ओसाड होऊन जातो. पावसाळ्यानंतर या ठिकाणी पुन्हा नव्याने रोपटी रुजवण्याचा उद्योग करावा लागतो. मात्र यावर पालिकेच्या उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी उपाय केला आहे.

या भागात फायकस बेंझामिन आणि फायकस पांडा ही रोपटी लावण्यात आली आहेत. गेल्यावर्षी यातील ७० झाडांना पावसाळ्यात हिरव्या जाळीने (ग्रीनहाऊस नेट) झाकण्यात आले होते. त्यामुळे पाण्याचा थेट मारा रोपटय़ांवर झाला नाही व त्यांची चांगली वाढ झाली. त्यामुळे यावर्षी १२० रोपटय़ांना हिरव्या जाळीने झाकण्यात आले आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. पावसाळ्यात साधारण नारळीपौर्णिमेपर्यंत लाटांचा जोर अधिक असतो. या काळापर्यंत ही जाळी लावण्यात येतील. त्यानंतर हा रेनकोट काढण्यात येणार आहे. यापूर्वी वांद्रे व वरळी येथेही हा प्रयोग करण्यात आला होता.

खाऱ्या वाऱ्याशी झुंज

कुलाबा येथील सागर उपवन हे उद्यान समुद्राच्या शेजारीच आहे. सुरुवातीला या उद्यानात लावलेली उत्तमोत्तम देशीविदेशी रोपटी समुद्रावरील खारे वारे आणि जमिनीतील क्षारांचे वाढलेले प्रमाण यामुळे तग धरत नव्हती. त्यानंतर हे खारे वारे रोखून धरणारी खारफुटी किनाऱ्यावर लावली गेली आणि आज हे उद्यान मुंबईतील उत्तम उद्यानांपैकी एक आहे.