चढ्या किमतीला विक्री; भेसळीचे प्रमाण अधिक

मुंबई : करोनापासून बचावासाठी घालण्यात आलेल्या बंधनांचा परिणाम मद्यविक्रीवरही झाला असून ग्राहकांना गरजेनुसार मद्य उपलब्ध होणे अवघड झाले आहे. यातील व्यवसाय संधी हेरून अनेक बेरोजगार तरुणांनी दुकानांतून मद्यसाठा विकत घेऊन तो अवैधरीत्या, चढ्या किमतीस विकण्यास सुरुवात के ली आहे. याबरोबरच मद्यातील भेसळीलाही जोर चढला आहे.

मद्यभेसळीचा धंदा जुनाच असला तरी करोनाकाळात मद्यभेसळीचे प्रमाण वाढले असून बेरोजगारी आणि मद्याची अनुपलब्धता ही त्यामागील प्रमुख कारणे असल्याचा दावा संबंधित यंत्रणांकडून के ला जात आहे. पूर्वी गरजेनुसार मद्य उपलब्ध होत होते, तसेच एका दुकानात ठरावीक मद्य न मिळाल्यास अनेक पर्याय उपलब्ध होते. शिवाय करोनाकाळात घरपोच सेवा सुरू असली तरी ग्राहकांची मागणी किमान दोन हजार रुपयांच्या वर असल्यासच दुकानदार ती पूर्ण करतात. या स्थितीमुळे अनेक बेरोजगार तरुणांनी दुकानांतून मद्यसाठा खरेदी करून तो अवैधरीत्या विकण्यास सुरुवात के ली आहे. त्यामुळे ग्राहकांचा ओढाही दुकानांऐवजी अवैधरीत्या मद्य विकणाऱ्यांकडे वाढला. अशा व्यक्तींकरवी भेसळयुक्त मद्यसहज विकले जाऊ शकते, असे निदर्शनास आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

धारावीतील ढोरवाडा परिसरात पहाटे पाचच्या सुमारास छापा घालून पोलीस पथकाने रवी परमार या तरुणास अटक के ली. गेल्या काही महिन्यांपासून आरोपी भेसळ के लेले मद्य नागरिकांसह मद्यविक्री केंद्रांना विकत होता, अशी माहिती प्राथमिक चौकशीतून पुढे आल्याचे धारावी पोलिसांनी सांगितले. रवी महागड्या मद्याच्या रिकाम्या बाटल्या भंगारातून विकत घेत असे. त्यात दमणहून अवैधरीत्या मुंबईत आणलेली स्वस्त दारू भरत असे. मद्य बाटल्यांची झाकणे तो कोलकाता येथून मागवत असे. पोलिसांना कारवाईदरम्यान बाटली झाकणबंद करण्याचे यंत्र, रिकाम्या व भरलेल्या बाटल्या, झाकणे असे अडीच लाख रुपयांचे साहित्य सापडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलाब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनाकाळात बेरोजगार झाल्याने भेसळयुक्त मद्यविक्री सुरू केल्याचे आरोपीने सांगितले. त्याबाबत खातरजमा सुरू आहे. अशाच प्रकारच्या चार कारवाया गेल्या महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुंबई उपनगरांत केल्या होत्या.

भेसळ कशी?

दमण, गोवा येथून स्वस्त मद्य चोरट्या मार्गाने मुंबईत आणले जाते. त्याबरोबरच उंची, महागडे मद्यही विकत घेतले जाते. महागड्या मद्याच्या रिकाम्या बाटलीत साधारण मिळत्याजुळत्या चवीनुसार स्वस्त, कमी दर्जाचे मद्य भरले जाते किं वा उंची मद्याच्या बाटलीतून निम्मे मद्य काढून घेऊन त्यात कमी दर्जाचे मद्य भरले जाते. अशा प्रकारे भेसळ के ली जाते.

गावठी दारूचा अंमल…

गेल्या आर्थिक वर्षात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य तस्करी, भेसळ आदीबाबत एकूण ४५ हजार गुन्हे नोंदवले. त्यापैकी २५ हजार गुन्हे (५५ टक्के) गावठी दारू, हातभट्ट्यांशी संबंधित होते. या वर्षी एप्रिल महिन्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू झाल्यानंतर गावठी दारूचे गाळप वाढले. त्यानुसार कारवाईही ६७ टक्क्यांवर पोचल्याचे विभागातर्फे सांगण्यात आले.