जुनी पुस्तके गोळा करून वाटण्याची शिक्षण विभागाची सूचना

मुंबई : कोऱ्या पाठय़पुस्तकांशिवाय विद्यार्थ्यांचे नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून राज्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पाठय़पुस्तके पोहोचण्यास अजून दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. जुनी पुस्तके गोळा करून विद्यार्थ्यांना वाटण्याची सूचना शिक्षण विभागाने शाळांना दिली असली तरी ही पुस्तके गोळा कशी करायची असा प्रश्न शिक्षकांना पडले आहेत.

राज्यातील शासकीय, अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना शासनामार्फत मोफत पाठय़पुस्तके देण्यात येतात. गेल्यावर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या तोंडावर करोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचला असताना बालभारतीने राज्यातील कानाकोपऱ्यापर्यंत पुस्तके पोहोचवली. यंदा मात्र शैक्षणिक वर्षांची सुरुवात झाली तरी विद्यार्थ्यांच्या हाती पाठय़पुस्तके पडलेली नाहीत. कागद खरेदीवरून झालेल्या न्यायालयीन प्रकरणामुळे पुस्तकांची छपाई अद्याप झालेली नाही.

जुनी पुस्तके वापरण्याची सूचना

विद्यार्थ्यांकडून आदल्या वर्षीच्या इयत्तेची म्हणजे जुनी पुस्तके घेऊन ती दुसऱ्या विद्यार्थ्यांना देण्याची सूचना शिक्षण विभागाने जानेवारीत शाळांना दिल्या आहेत. मात्र, त्यानंतरही शाळा बंदच असल्यामुळे शिक्षकांना पुस्तके गोळा करता आलेली नाहीत. त्यामुळे जुनी पुस्तके द्यायची कशी आणि कधी घ्यायची असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे. ‘अलीकडे पुस्तकांची बांधणी चांगल्या दर्जाची नसते. पुस्तक हाताळल्यावर काही दिवसातच पाने सुटतात. पुस्तके एका वर्षांत जीर्ण होतात. अशावेळी ती पुस्तके दुसऱ्या विद्यार्थ्यांना देणे योग्य नाही, असे एका शिक्षकांनी सांगितले.

उजळणी कशी घ्यायची?

विद्यार्थ्यांचे वर्ग गेल्यावर्षी नियमित होऊ शकले नाहीत. त्यामुळे यंदा वर्षांच्या सुरुवातीला आदल्यावर्षीच्या अभ्यासक्रमाची उजळणी घेण्याची सूचना शिक्षण विभागाने दिली आहे. मात्र, विद्यार्थ्यांसमोर गेल्यावर्षीचे पाठय़पुस्तकच नसेल तर उजळणी घेणे शक्य नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. ‘विद्यार्थ्यांच्या हातातील पाठय़पुस्तक हे महत्त्वाचे अभ्यास साहित्य आहे. सध्याच्या परिस्थितीत शाळा, अभ्यास याच्याशी जोडून ठेवण्यासाठी अनेक भागांत विद्यार्थ्यांसाठी पाठय़पुस्तक हे एकमेव साधन आहे. अशावेळी इयत्ता बदलली तरी आदल्यावर्षीची पाठय़पुस्तके विद्यार्थ्यांकडून काढून घेणे योग्य नाही,’ असे मत एका मुख्याध्यापकांनी व्यक्त केले.

छपाईचा मार्ग मोकळा पण..

न्यायालयाच्या निर्णयानंतर मंगळवारी पुस्तकछपाईचा बालभारतीचा मार्ग मोकळा झाला. मात्र, आता बालभारतीला कागद खरेदीसाठी नव्याने निविदा काढावी लागणार आहे. त्यानंतर या प्रक्रियेसाठी साधारण दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

पुस्तके  पुनर्निर्मित कागदाचीच..

पुनर्निर्मित कागदाचा वापर पाठय़पुस्तकांसाठी करण्याचा निर्णय घेऊन बालभारतीने ४ मार्चला निविदा काढल्या. बालभारतीच्या निर्णयाला कागद पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पुनर्वापरातून तयार केलेल्या कागदामध्ये रसायन असते. परिणामी ते मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असा दावा कंपन्यांनी केला. या न्यायालयीन प्रकरणाचा अंतिम निर्णय मंगळवारी झाला. मात्र तोपर्यंत बालभारतीला पुस्तकांची छपाई करता आली नाही. न्यायमूर्ती सुरेश गुप्ते आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी पुन्हा सुनावणी झाली.

कागदाचा पुनर्वापर हा पर्यावरणस्नेही असून तो आरोग्यासाठी धोकादायक नाही, असे  बालभारतीतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आणि अ‍ॅड्. जगदीश रेड्डी यांनी न्यायालयाला सांगितले. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांबाबतही न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायालयाने बालभारतीचा म्हणणे योग्य ठरवत कंपन्यांच्या याचिका फेटाळून लावल्या. त्यामुळे आता पुनर्निर्मित कागद पाठय़पुस्तकांमध्ये वापरण्यात येणार आहे.

रिकाम्या वर्गात ऑनलाइन श्रीगणेशा..

गंधयुक्त पुस्तके, नवा गणवेश, नवे दप्तर आणि नव्या सवंगडय़ांसह वर्गात दाखल होण्याचा आनंद यंदाही विद्यार्थ्यांना घेता आला नाही.

गेल्या वर्षी राज्यात शाळा सुरू झाल्या नसल्या, तरी ऑनलाइन शिक्षण थांबले नव्हते. या वर्षीही शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांविना भरला.

खासगी वितरणासाठीही पाठय़पुस्तके  बालभारतीच्या वितरण भांडारांमध्ये उपलब्ध आहेत. मोफत पाठय़पुस्तकांच्या छपाईसाठी पुरेसा कागद नव्हता. मात्र आता कागद खरेदी करून लवकरच ही पाठय़पुस्तके  उपलब्ध करून देण्यात येतील.

– दिनकर पाटील, संचालक, बालभारती