प्रतिकूल परिस्थितीच्या विरोधात लढण्याबरोबरच माणसांच्या अन्याय्य मानसिकतेवर मात करून संपन्न आयुष्य जगणाऱ्या आणि अनेकांना जगायला शिकवणाऱ्या समाजातील ‘नवदुर्गा’चा सन्मान करण्यासाठी ‘लोकसत्ता’ने शुक्रवार, १७ ऑक्टोबर रोजी ‘सन्मान सोहळा नवदुर्गाचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नामवंत स्त्रियांकडून या नवदुर्गाचा सत्कार होणार असून त्यासोबत नृत्य-सुरांची अनोखी मैफलही रंगणार आहे. रवींद्र नाटय़मंदिरात सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
  नाटय़ संमेलनाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष व अभिनेत्री फैयाझ, अर्थतज्ज्ञ रूपा रेगे-नित्सुरे, उद्योजिका मीनल मोहाडीकर, उद्योजिका वीणा पाटील, पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर, स्त्रीरोगतज्ज्ञ नंदिता पालशेतकर, सामाजिक कार्यकर्त्यां अनुराधा गोरे, माजी आयपीएस अधिकारी आभा सिंग आदींच्या हस्ते या नवदुर्गाचे सत्कार होणार आहेत.  तुमच्या-आमच्यातील दुर्गाच्या कार्याची ओळख समाजाला व्हावी, यासाठी यंदा नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ‘शोध नवदुर्गाचा’ हा उपक्रम ‘लोकसत्ता’ने राबवला होता.
त्यात प्रतिकूल परिस्थितीच्या विरोधात लढून स्वत:चे एक स्थान निर्माण करणाऱ्या नऊ स्त्रियांच्या कार्याची ओळख लेखांच्या स्वरूपात करून देण्यात आली होती. शुक्रवारी होणाऱ्या समारंभात उत्तरा मोने यांच्या ‘मिती क्रिएशन्स’तर्फे ‘संगीतमय सन्मान सोहळा नवदुर्गाचा’ या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार असून सोनिया परचुरे, तनुजा जोग, अद्वैता लोणकर, श्रीरंग भावे आणि इतर सहकारी कलाकार यात सहभागी होतील.
हा कार्यक्रम विनामूल्य असून प्रवेशिका रवींद्र नाटय़मंदिर येथे उपलब्ध असतील. तसेच कार्यक्रमाच्या दिवशी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क- ६७४४०३४७/३६९.