28 September 2020

News Flash

जीपीएस प्रणाली सक्षम करण्यासाठी ‘प्रथम’ प्रयोग

विद्यार्थी उपग्रह संकल्पना मांडणाऱ्या शशांकचे स्वप्न आज प्रत्यक्षात

विद्यार्थी उपग्रह संकल्पना मांडणाऱ्या शशांकचे स्वप्न आज प्रत्यक्षात

‘एअरोस्पेस अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना टाटा मूलभूत विज्ञान संस्थेत (टीआयएफआर) संशोधनासाठी जायचो. त्यावेळी तेथील प्राध्यापक डॉ. मयंक वाहिया यांनी विद्यार्थी उपग्रह विकसित करण्याची संकल्पना मांडली. मग मी व माझा सहअध्यायी सप्तर्षी बंडोपाध्याय आम्ही दोघांनीही त्यावर काम करण्यास सुरुवात केली. मुळात विद्यार्थी उपग्रह विकसित करण्याची संकल्पना २००७ मध्ये तशी नवीनच होती. आम्ही अथक संशोधन केले. आमच्या प्रकल्पात अनेक जण जोडले गेले. आयआयटीतील प्राध्यापकांनीही आम्हाला पाठिंबा दिला. अखेरीस इस्रोसमोर प्रकल्पाचे सादरीकरण केले. तेथील वैज्ञानिकांनी अनेक प्रश्न विचारले आणि त्यांच्या सल्ल्यानुसार मग प्रकल्पात बदल केले. आज आमचा हा ‘प्रथम’ प्रकल्प अवकाशात झेपावणार आहे. खूप आनंद होत आहे’, अशा शब्दांत ‘प्रथम’ या विद्यार्थी उपग्रहाची संकल्पना मांडणाऱ्या शशांक तामसकर याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या ‘प्रथम’ या विद्यार्थी उपग्रहाचे आज, सोमवारी प्रक्षेपण होणार आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून वातावरणातील विद्युत परमाणू मोजले जाणार असून त्याचा उपयोग जीपीएस प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी होणार असल्याचे शशांक याने स्पष्ट केले. मुंबई आयआयटीचा माजी विद्यार्थी असलेला शशांक अमेरिकेतील ओहायो राज्याची राजधानी असलेल्या कोलंबस या शहरात राहात असून एअरोस्पेस अभियांत्रिकीत तो संशोधनाचे काम करत आहे. ‘प्रथम’ उपग्रहाच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळातील आठवणींना त्याने उजाळा दिला. तो म्हणाला, ‘डॉ. वाहिया यांनी उपग्रह विकसित करण्याची संकल्पना मांडल्यानंतर आम्ही आयआयटीतील आमचे विभागप्रमुख प्रा.  सुधाकर यांना ही माहिती दिली. पण त्यावेळेस संकल्पना अगदीच नवीन असल्यामुळे यात पुढे नेमके काय होऊ शकेल याचा अंदाज कोणालाच नव्हता. मात्र, प्रा. सुधाकर यांच्या सल्ल्यानुसार आम्ही आमचे काम पुढे सुरू ठेवले.’

अनेकांचा समावेश

शशांक आयआयटीच्या विज्ञान मंडळाचा प्रमुख होता यामुळे त्याने ही संकल्पना विज्ञान मंडळातील विद्यार्थ्यांपुढे मांडली. या प्रकल्पात सर्वच अभियांत्रिकीच्या शाखांतील विद्यार्थ्यांचा समावेश अपेक्षित होता. जगभरातील विद्यापीठांनी यासंदर्भात काय केले आहे याची माहिती गोळा झाल्यानंतर तीन महिन्यांनी एक सादरीकरण करण्यात आले. नवी आणि आकर्षक संकल्पना असल्याने अनेकांनी या प्रकल्पात सहभागी होण्याची तयारी दर्शविली.निवडक विद्यार्थ्यांना नेमण्यासाठी घेतलेल्या परीक्षेतून ३० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.  त्यांना उपग्रहाच्या वेगवेगळय़ा विभागची जबाबदारी सोपवण्यात आली. यानंतर एक अंतिम सादरीकरण करून ते प्राध्यापकांना दाखविण्यात आले. त्यानंतर इस्रोशी संपर्क साधला. इस्रोच्या लघुउपग्रह विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. राघव मूर्ती यांनी आम्हाला सादरीकरणासाठी बोलावले. तेथे उपस्थित वैज्ञानिकांनी आम्हाला इतके प्रश्न विचारले की तेव्हा आम्हाला आम्ही किती पाण्यात आहोत ते लक्षात आले. मग इस्रोच्या सल्ल्यानुसार प्रकल्पात बदल करून प्रकल्प अधिक सोपा व सुटसुटीत करण्यात आल्याचे शशांक म्हणाला.

मी पाहिलेले एक स्वप्न आयआयटी मुंबईतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या मदतीने आज प्रत्यक्षात येणार आहे. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २००९ मध्ये मी आयआयटीतून बाहेर पडलो. मात्र, त्यानंतरही हा प्रकल्प सुरू राहिला हा आनंद माझ्यासाठी खूपच मोठा आहे. भविष्यात संधी मिळाल्यास आणखी एक उपग्रह विकसित करण्याचा मानस आहे.

– शशांक तामसकर, एअरोस्पेस अभियंता

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2016 2:05 am

Web Title: new experiment on gps system
Next Stories
1 हतबलता की मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न?
2 देणाऱ्याचे हात हजारो..
3 निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपचे ‘स्मार्ट’ गाजर!
Just Now!
X