राज्यातील अनधिकृत पॅथॅलॉजी लॅबविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच यासाठी नवीन कायदा आणण्यात येईल, असे आश्वासन वैदयकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी विधानसभेत दिले.
राज्यामध्ये सध्या तीन ते पाच हजार अनधिकृत पॅथॅलॉजी लॅब असून, त्यातील ६० ते ७० टक्के लॅब या शहरी भागात आहेत. या लॅबमधून दररोज हजारो रुग्णांच्या चाचण्या करण्यात येत असून, या चाचण्या बेकायदा असल्याची लक्षवेधी सूचना विजय वड्डेटीवार, प्रा. वीरेंद्र जगताप आदी सदस्यांनी विधानसभेत मांडली होती. या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना तावडे म्हणाले, अनधिकृत पॅथॅलॉजी लॅबविरुद्ध कारवाई करण्यासाठी सध्या कायद्याचा आधार नाही. यासाठीच महाराष्ट्र परावैद्यक परिषदचे विधेयक २०११मध्ये मांडण्यात आले होते. विधीमंडळाने हे विधेयक संमत केल्यावर राज्यपालांनी ते स्वाक्षरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठविले. परंतु, केंद्र सरकारने यामध्ये काही सुधारणा सुचविल्या आहेत. या सुधारणांचा विचार करुन हे विधेयक दुरुस्तीसह पुन्हा पाठविण्यास राज्य सरकारची तयारी आहे. त्यामुळे हे विधेयक मागे घेऊन ते दुरुस्तीसह पुन्हा मांडण्यात येईल. यासाठी आवश्यक विधी व न्याय विभागाचा अभिप्राय मागविण्यात येईल, असेही तावडे यांनी यावेळी सांगितले.