शैलजा तिवले/ इंद्रायणी नार्वेकर

एकीकडे आरटीपीसीआर चाचण्यांबाबतची अविश्वासार्हता आणि पालिकेच्या यंत्रणांचा ससेमिरा टाळण्यासाठी सिटी स्कॅन किंवा क्ष-किरण चाचण्यांद्वारे पळवाट काढत करोनाचे निदान करण्याकडे  कल वाढत आहे आणि दुसरीकडे आरटीपीसीआर चाचणीत बाधित नसल्याचे निदान होऊनही सिटी स्कॅन चाचणीत मात्र फुप्फुसावर परिणाम झाल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे चाचण्यांमधून करोनाबाधित असल्याचा शिक्का न मिळालेल्या रुग्णांना कोठे दाखल करावे, असा प्रश्न डॉक्टरांपुढे निर्माण झाला आहे.

कुल्र्यातील वंदना शेडगे (नाव बदलले आहे) यांना तापासह अन्य लक्षणे असल्याने आरटीपीसीआर चाचणी केली. घरातल्यांनाही सौम्य लक्षणे असल्याने त्यांचीही चाचणी केली. चाचण्यांत घरातल्या इतरांना बाधा झाल्याचे समजले. मात्र त्या करोनाबाधित नाहीत, असे समजले. ६०हून अधिक वय असल्याने सिटी स्कॅन केले. यात मात्र त्यांच्या फुप्फुसाला संसर्ग झाल्याचे दिसून आले. त्यांच्यावर तातडीने उपचार होणे गरजेचे होते. परंतु करोनाचा अहवाल नसल्याने त्यांना कोणतेही रुग्णालय दाखल करून घेत नव्हते. पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करून अहवाल येण्यासाठी किमान दोन दिवस जातील. या दरम्यान त्यांचा संसर्ग वाढण्याची भीतीही होती. त्यामुळे शेवटी घरीच त्यांना औषधे सुरू केली आणि दोन दिवसांनी पुन्हा चाचणी केली. त्यात बाधित असल्याचे समजले. तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल केले, असा अनुभव कुल्र्यातील खासगी डॉक्टरांनी व्यक्त केला.

अशा परिस्थितीबाबत मात्र कोणतीही नियमावली नाही, त्यामुळे अशा रुग्णांच्या बाबतीत काय निर्णय घ्यावा, असा संभ्रम डॉक्टरांपुढे असल्याचे असोशिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटचे अध्यक्ष डॉ. दीपक बैद यांनी सांगितले.

करोनाच्या चाचण्या खासगी प्रयोगशाळेत केल्या तरी त्याचे अहवाल पालिकेला कळविणे बंधनकारक आहे. पालिका रुग्णाची माहिती घेऊन प्रकृतीनुसार घरी राहण्याचा किंवा रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देते. पालिका यंत्रणा दाराशी येण्याचे टाळण्यासाठी उच्चभ्रू वर्ग आरटीपीसीआर, प्रतिजन या चाचण्या करण्यापेक्षा क्ष-किरण किंवा सिटी स्कॅन हे दोन पर्यायांचा वापर केला जात आहे.

करोनाबाधितांप्रमाणे उपचार करणे गरजेचे

आरटीपीसीआर चाचणीची अचूकता ७५ टक्के आहे, तर सिटी स्कॅन चाचणीची अचूकता जवळपास ९७ टक्के आहे. त्यामुळे अहवालात बाधित आढळले नाही तरी फुप्फुसापर्यंत संसर्ग पोहोचल्याचे आढळून येते. अशा रुग्णांवर करोनाबाधित म्हणूनच उपचार करणे आवश्यक आहे. तसेच यांना संशयित करोनाबाधितांचा विभाग किंवा अतिदक्षता विभागात दाखल करायला हवे. तसेच आरटीपीसीआर चाचण्यांसाठी योग्य रितीने नमुने घेणेही आवश्यक आहे. त्यामुळेदेखील अहवाल चुकीचा येण्याचा संभव असल्याचे करोना कृतिदलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.

आरटीपीसीआर चाचणी आवश्यक

सिटी स्कॅन किंवा क्ष-किरण हे सदोष आढळले तरी त्याची अन्य कारणेही असू शकतात. त्यामुळे थेट करोनावरचे उपचार करण्याआधी आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक आहे. आरटीपीसीआर चाचणी ही करोनाची खातरजमा करून देणारी चाचणी मुंबई पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.