मुंबई : मुंबई ते नाशिक आणि मुंबई ते पुणे मार्गावर वेगवान प्रवासासाठी ‘मेमू’ गाडी चालवण्याचा विचार केला जात आहे. या गाडीच्या लवकरच कसारा-लोणावळा क्षेत्रात चाचण्या केल्या जाणार असून त्यासाठी चेन्नईतील रेल्वे कारखान्यातून नवीन मेमू गाडी मध्य रेल्वेच्या कळवा कारशेडमध्ये दाखल झाली आहे.

प्रवास वेळ कमी करण्यासाठी तसेच पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी मध्य रेल्वे ‘मेमू’ (मेनलाइन इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट) मुंबई -पुणे, मुंबई-नाशिक व  मुंबइ-बडोदा या तीन महत्त्वाच्या मार्गावर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नवीन मेमू मध्य रेल्वेकडे दाखल झाली आहे. या गाडीच्या चाचण्या घाट क्षेत्रामध्ये घेण्यात येतील व त्यानंतरच ही गाडी पुन्हा दिल्लीला रवाना केली जाणार असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले. चाचण्या यशस्वी झाल्यास मध्य रेल्वेला मेमू गाडी मिळणार आहे. ही गाडी १८ डब्यांची असेल. नवीन मेमची प्रवासी क्षमता अधिक असेल.