12 August 2020

News Flash

‘बीकेसी कनेक्टर’मुळे नवी कोंडी

नवी मुंबईतून वांद्रे प्रवासात सुमारे ३० मिनिटांची बचत

सोमय्या मैदान ते वांद्रे कुर्ला संकुल उन्नत मार्ग सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडीच्या नव्या ठिकाणांमध्ये वाढ झाली आहे.

वेळेची बचत; मात्र वाहतूक कोंडीच्या ठिकाणांमध्ये वाढ

चुनाभट्टी रेल्वे स्थानकाजवळील सोमय्या मैदान ते वांद्रे-कुर्ला संकुल यांना जोडणारा ‘बीकेसी कनेक्टर’ हा उन्नत मार्ग सुरू झाल्यानंतर पूर्व उपनगर आणि नवी मुंबईतून वांद्रे प्रवासात सुमारे ३० मिनिटांची बचत होत असली, तरी वाहतूक कोंडीची नवीन ठिकाणेही निर्माण झाली आहेत.

बीकेसी कनेक्टर नसताना पूर्व द्रुतगती मार्गावरून वांद्रे-कुर्ला संकुलात येणाऱ्या वाहनांना सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडचा (एससीएलआर) तर नवी मुंबईकडून येणाऱ्या वाहनांना शीव आणि धारावीमार्गे प्रवास करावा लागत असे. या दोन्ही ठिकाणी कायमच प्रचंड वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागायचे. रविवारपासून बीकेसी कनेक्टरचा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर मात्र वाहतूक कोंडी टळून वांद्रे कुर्ला संकुलात येताना सुमारे ३० मिनिटांची बचत होऊ लागली. बीकेसी कनेक्टरवरून होणारी वाहतूक वेगाने होत असली तरी त्याच वेळी वांद्रे-कुर्ला संकुलात भारतनगर ते कलानगर टप्प्यात आणि शीवकडे येताना प्रियदर्शनी सर्कल ही वाहतूक कोंडीची नवीन ठिकाणे तयार झाली आहेत.

बीकेसी कनेक्टरमुळे गेल्या पाच दिवसांत एससीएलआरवर वाहतूक कोंडीचा त्रास कमी झाल्याचे बस आणि रिक्षाचालकांनी सांगितले. कुर्ला रेल्वे स्थानक ते वांद्रे-कुर्ला संकुलदरम्यान शेअर रिक्षाचालकांनी एलबीएस मार्ग, कुर्ला आगार येथील वाहतूक कोंडी कमी झाली असल्याचे सांगितले. सध्या प्रत्येक फेरीचा वेळ वाचल्यामुळे रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू असणाऱ्या फेऱ्या सायंकाळी साडेसातपर्यंतच पूर्ण होत असल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. त्याच वेळी बीकेसी कनेक्टरचा वापर करून पश्चिम द्रुतगती मार्ग आणि वांद्रे पश्चिमेला जाणाऱ्या वाहनांची गर्दी वांद्रे-कुर्ला संकुलात होत असल्यामुळे भारतनगर ते कलानगर जंक्शन या भागात चांगलीच कोंडी होत असल्याचे ते सांगतात. एरवी दुपारच्या वेळी या परिसरात वाहनांची गर्दी तुलनेने कमी असते, मात्र गेल्या पाच दिवसांत कलानगर जंक्शनचा सिग्नल पार करण्यास दुपारच्या वेळीदेखील किमान दहा मिनिटे थांबावे लागत आहे. त्यातच या ठिकाणी कलानगर उड्डाणपूल आणि डी. एन. नगर ते मंडाले या ‘मेट्रो २ बी’ मार्गिकेचे काम सुरू आहे. त्यामुळे तेथील मार्ग मुळातच आक्रसलेला असून त्यात वाहनांच्या या नव्या लोंढय़ाची भर पडत आहे.

दुसरीकडे पूर्व द्रुतगती मार्गावरून एससीएलआरचा वापर न करता अनेक वाहनांनी बीकेसी कनेक्टरचा पर्याय स्वीकारला असल्यामुळे त्यांचा लोंढा प्रियदर्शनी सर्कल येथे धडकत असल्याचे दिसून येते. सकाळी आणि सायंकाळी घाई-गर्दीच्या वेळी तेथे वाहनांच्या रांगा वाढल्या आहेत.

आणखी भर..

बीकेसी कनेक्टर सुरू झाल्यानंतर लगेचच शीव येथील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या येथे प्राथमिक काम सुरू असून पुढील आठवडय़ात बेअिरग बदलण्यासाठी हा उड्डाणपूल बंद ठेवावा लागणार आहे. त्या वेळी एकूणच या सर्व परिसरातील वाहतूक कोंडीत आणखीन भर पडण्याची शक्यता दिसून येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2019 1:10 am

Web Title: new problem due to bkc connector abn 97
Next Stories
1 दैनंदिन समस्यांवर विद्यार्थ्यांची कल्पक उत्तरे
2 ‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड
3 विरोधी बाकावरून सेना संसदेत आक्रमक
Just Now!
X