पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार ३०० कोटींचा चुना नीरव मोदीने लावला. याप्रकरणी पीएनबीच्या ब्रीच कँडी येथील शाखेचा निवृत्त शाखा उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी आणि त्याच्यासह आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. हेमंत भट्ट आणि मनोज खरात अशी अटक करण्यात आलेल्या इतर दोघांची नावे आहेत. नीरव मोदीचा घोटाळा यूपीएच्या कार्यकाळात म्हणजे २०११ मध्ये सुरु झाला होता असा दावा भाजपाने केला होता. मात्र सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये हा घोटाळा २०१७ ते १८ दरम्यान म्हणजेच एनडीएच्याच कार्यकाळात झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या एफआयआरमुळे भाजपाचा दावा फोल ठरला आहे.

पीएनबी घोटाळा उघड झाल्यापासून करण्यात आलेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे. सीबीआयने गोकुळनाथ शेट्टीच्या घरी धाड टाकली त्यानंतर त्याच्या पत्नीची आणि भावाचीही चौकशी केली आहे. मनोज खरात हा सिंगल विंडो ऑपरेटर तर हेमंत भट्ट हा नीरव मोदी आणि ग्रुपचा अधिकृत स्वाक्षरीकर्ता (ऑथराईज्ड सिग्नेटरी) असल्याची माहिती समोर येते आहे.

पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार ३०० कोटींचा चुना लावून नीरव मोदी पळाला आहे. नीरव मोदीला लेटर ऑफ अंडरटेकिंग मिळवून देण्यात गोकुळनाथ शेट्टीचा मोठा हात असल्याची माहिती समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पीएनबी घोटाळ्याच्या चौकशीसाठी सीबीआयने २१ पेक्षा जास्त मालमत्तांवर छापे मारले आहेत. या मालमत्ता नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या आहेत. तसेच हे धाडसत्र सुरुच राहणार असल्याचे इडीनेही स्पष्ट केले आहे. शुक्रवारी सीबीआयने या प्रकरणी नव्याने आरोपपत्र दाखल केले. ज्यामुळे गीतांजली ग्रुपचा प्रमोटर मेहुल चोक्सी आणि पीएनबीच्या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत. तसेच नीरव मोदीचेही नाव आहेत.