लोकसभा निवडणूक न लढविता नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पािठबा द्या, अशी गळ घालण्यासाठी भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. विरोधी पक्षांचे मतविभाजन टाळण्यासाठी भाजपने पुन्हा प्रयत्न चालविले असून या ‘राज’कारणामुळे शिवसेनेत कमालीची नाराजी  पसरली आहे. भाजपच्या प्रस्तावावर राज ठाकरे लगेचच आपली भूमिका जाहीर केलेली नाही, पण लोकसभेपुरता हा समझोता स्वीकारला जाईल, असे सूत्रांचे मत आहे.
लोकसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी अपेक्षित असताना या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज ठाकरे यांना ‘रालोआ’ मध्ये आणण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. पण ते असफल झाल्यानंतर ‘हा विषय आता संपला’ असे युतीच्या नेत्यांनी जाहीरपणे सांगितले होते. पण ‘आप’ च्या प्रभावाची जाणीव झाल्यानंतर भाजपने मात्र लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांमधील मतांची फाटाफूट टाळण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यामुळे ‘रालोआ’ मध्ये येण्यासाठी मनसेची तयारी नसली आणि शिवसेनेचा तीव्र विरोध असला तरी भाजपने सर्वतोपरी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. राज ठाकरे यांची पंतप्रधानपदासाठी मोदी यांना पसंती आहे. मनसेकडे लोकसभा निवडणुकीत विजय मिळविता येतील, असे खात्रीचे मतदारसंघही मनसेकडे नाहीत. मनसे, आप आणि एखादा प्रभावी अपक्ष उभा राहून बहुरंगी लढती झाल्यास त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होईल. त्यामुळे लोकसभेसाठी मोदींना जाहीरपणे पाठिंबा देऊन मोदींचा विजय अधिक सोपा करण्यासाठी मदत देण्याची विनंती गडकरी यांनी आपल्या वैयक्तिक स्नेहसंबंधांचा वापर करीत राज ठाकरे यांना केल्याचे सूत्रांनी सांगितले.
 ‘फोर सीझन्स’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या या भेटीत राज आणि नितीन गडकरी यांच्या ‘गुफ्तगू’ झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. दोन्ही नेत्यांनी चर्चेचा फारसा तपशील उघड केला नसला तरी शिवसेनेचा विरोध सहन करून आणि मनसेची राजकीय अडचण होऊ न देता रालोआला लोकसभेसाठी मदतीचा हात कसा देता येईल, याबाबत चर्चा झाली. राज ठाकरे यांना रालोआमध्ये घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा तीव्र विरोध आहे. शिवसेनेशी असलेली दीर्घकाळापासूनची युती लक्षात घेता उद्धव यांना नाराज करण्याची भाजपची तयारी नाही आणि मनसेची साथ मात्र हवी आहे. त्यातून मनसेने लोकसभा निवडणूक लढवू नये,  हा ‘राज’मार्ग तयार करण्यात आला आहे.  

देशाला काँग्रेसमुक्त करायचे आहे. त्यासाठी विरोधी पक्षांचे मतविभाजन टाळणे आवश्यक आहे. म्हणूनच मनसे अध्यक्षांची भेट घेतली. याचा अर्थ मनसे लगेचच रालोआत येईल असे नाही. माझे सर्व पक्षातील राजकीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत. मला कोणाच्याही भेटीसाठी परवानगीची आवश्यकता नाही. या भेटीमुळे उद्धव ठाकरेंनी नाराज होण्याचे कारण नाही. मनसेशी संबंधित विषय अंतिम टप्प्यात असेल, तेव्हा त्यांच्या संमतीनेच तो घेतला जाईल.
नितीन गडकरी, भाजपचे माजी अध्यक्ष