मुंबई उच्च न्यायालयाने बिल्किस बानो Bilkis Banos बलात्कार प्रकरणात निकाल दिला आहे. या प्रकरणातील १२ आरोपींची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. बिल्किस बानो बलात्कार आणि हत्या प्रकरणात १२ आरोपींनी सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यानंतर आरोपींनी या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाने सुनावलेला निकाल कायम ठेवला आहे.

२००२ च्या बिल्किस बानो बलात्कार आणि हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सहा पोलिसांना दोषी ठरवले आहे. यासोबतच या प्रकरणातील तिघांच्या फाशीची मागणीदेखील मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

गुजरातची राजधानी अहमदाबादपासून २५० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रंधीकपूर गावातील बिल्कीस कुटुंबावर जमावाने हल्ला केला होता. त्यावेळी बिल्कीसचे वय १९ वर्षे होते आणि ती ५ महिन्यांची गर्भवती होती. यावेळी आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बिल्कीसच्या कुटुंबातील १४ जणांची हत्या करण्यात आली होती. यामध्ये तीन दिवसांच्या एका चिमुरड्याचा समावेश होता.

सामूहिक बलात्कार केल्यानंतर बिल्कीसला मारहाण करण्यात आली. मारहाणीमुळे बिल्कीस मरण पावली असल्याचे समजून आरोपी तिथून निघून गेले. या प्रकरणात सीबीआयने तिघांनी फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. बिल्कीससोबत अत्यंत क्रूर वर्तन केल्याने सीबीआयने तिघांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. २००५ पासून बिल्कीस प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली.