25 February 2021

News Flash

खासगी वाहनप्रवास आता मुखपट्टीमुक्त

मुंबई पालिकेचा निर्णय; सार्वजनिक वाहनांमध्येच अनिवार्य

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई पालिकेचा निर्णय; सार्वजनिक वाहनांमध्येच अनिवार्य

मुंबई : करोना रुग्णांच्या संख्येत होणारी घट आणि लसीकरणाची सुरुवात या बाबी विचारात घेऊन मुंबईमध्ये खासगी वाहनांतून मुखपट्टीविना प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मुखपट्टीचा वापर बंधनकारकच आहे.

करोना विषाणू संसर्गाचे प्रमाण घटत असल्याने खासगी वाहनांतही मुखपट्टीची आवश्यकता आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. खासगी वाहनांमध्ये मुखपट्टी वापरण्याची सक्ती रद्द करावी, अशी मागणीही करण्यात येत होती. याबाबत विचार करून खासगी वाहनांमधून मुखपट्टीविना प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करू नये, असे आदेश मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘क्लिन अप मार्शल’ना दिले आहेत. त्यामुळे आता खासगी वाहनांतून मुखपट्टीमुक्त प्रवास करता येईल.

करोना विषाणू साथीच्या प्रतिबंधासाठी राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या सर्वाना मुखपट्टीचा वापर बंधनकारक केला होता. मुखपट्टीविना फिरणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले होते. त्यानुसार मुंबई महापालिका प्रशासनातर्फे २० एप्रिल २०२० पासून मुखपट्टीविना फिरणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत होती.

मुखपट्टीविना फिरणाऱ्यांकडून सुरुवातीला एक हजार रुपये दंड घेण्यात येत होता, मात्र त्यावरून वाद होऊ लागल्याने दंडाची रक्कम २०० रुपये करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणे, बाजार, मंडया आदी ठिकाणी कारवाई करण्यासाठी पालिकेने पथके तैनात केली आहेत. पालिका कर्मचारी, क्लिन अप मार्शल यांचा पथकांमध्ये समावेश आहे. दंडात्मक कारवाई करण्यात येत असली तरीही आजही अनेक जण मुखपट्टीविना सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे.

सार्वजनिक, तसेच खासगी वाहनांमधून फिरणाऱ्यांनाही मुखपट्टीचा वापर बंधनकारक करण्यात आला होता. मात्र, खासगी वाहनांमधून फिरणाऱ्या मुंबईकरांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला. खासगी वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली आहे. प्रवाशांमध्ये अंतर राखले जात असून मुखपट्टीची गरज काय, असा प्रश्न वारंवार उपस्थित करण्यात येत होता. यावरून पालिकेची पथके आणि प्रवासी यांच्यामध्ये खटके उडत होते.

दंडात्मक कारवाई

’ खासगी वाहनांना सूट दिली असली तरी सार्वजनिक वाहनांमधून मुखपट्टीविना प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

’ सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मुखपट्टीसक्तीबाबत एक-दोन दिवसांमध्ये आदेश जारी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2021 3:15 am

Web Title: no fine for not donning masks inside private vehicles says bmc zws 70
Next Stories
1 विद्यापीठाच्या कारभारात शासनाचा वाढता हस्तक्षेप
2 लोकसहभागातून वाचन चळवळीस आकार
3 मागणी वाढल्याने मासे महागले
Just Now!
X