एका दिवसात ३२ लाखांची दंडवसुली

मुंबई : मुखपट्टी न लावणाऱ्यांविरोधात पालिकेने कठोर पावले उचण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी एका दिवसात १६ हजार १५४ जणांकडून प्रत्येकी २०० रुपये यानुसार एकूण ३२ लाख ३० हजार ८०० रुपये दंडवसुली के ली.

अंधेरी भागात हे प्रमाण अधिक आहे. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दर दिवशी २५ हजार जणांवर कारवाई करण्याचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य पालिके च्या यंत्रणेला अद्याप गाठता आलेले नाही. रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यानंतर मुखपट्टी लावण्याबाबत नागरिक दक्ष नव्हते. मुंबईतील करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमी वर पालिकेने मुखपट्टीविना फिरणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई कठोर करण्याचे ठरवले आहे. त्याकरिता मार्शलची संख्याही दुप्पट करण्यात आली आहे. दंडात्मक कारवाई अधिक प्रभावीपणे व व्यापकतेने करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त चहल यांनी दिले होते. त्यानुसार शनिवारी मुंबईत मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली.

उपाहारगृहे, क्लब, जिमखाना, चित्रपटगृहे, मंगल कार्यालये, उद्याने अशा  सार्वजनिक ठिकाणी कारवाई करण्यात आली. करोनाविषयक प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला आहे. मुखपट्ट्या न लावणाऱ्या १६ हजार १५४ जणांवर प्रत्येकी रुपये २०० यानुसार एकूण ३२ लाख ३० हजार ८०० रुपये  दंडवसुली करण्यात आली.