मुंबईतील वांद्रे मतदार संघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे निराश होण्याची गरज नाही. नारायण राणे हे लढवय्ये नेते आहेत. एखाद-दुसऱया पराभवामुळे ते खचून जाणार नाहीत, अशी प्रतिक्रिया काँग्रेस खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. वांद्रे पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांना शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांच्या विरुद्ध १९,००८ मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले. यावर अशोक चव्हाण प्रतिक्रिया देताना म्हणाले की, राणेंचा पराभव झाला असला तरी, काँग्रेसला मिळालेल्या मतदानाची आकडेवारी पाहता वांद्रे निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या मतदानाची टक्केवारी मागील निवडणुकीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे उलट राणेंमुळे या मतदार संघातील काँग्रसेची मतं वाढली. नारायण राणेंशिवाय दुसरा कोणताही उमेदवार तिथे टीकला नसता, असेही अशोक चव्हाण म्हणाले. पक्ष नारायण राणेंच्या मागे खंबीरपणे उभा आहे आणि या पराभवामुळे राणेंच्या वाटचालीवर काही परिणाम होईल असे वाटत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, वांद्रे निवडणुकीत नारायण राणेंना शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांच्याविरोधात तब्बल १९,००८ मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या सहा महिन्यात राणेंचा हा विधानसभा निवडणुकीतील दुसरा पराभव आहे.