तपास यंत्रणांचा राजकीय वापर करण्याची भाजपची पद्धत नाही, आम्ही कधीही त्यांच्या कामात हस्तक्षेप करत नाही, अशा शब्दांत केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ईडीसारख्या यंत्रणेचा महाराष्ट्रात विरोधकांना जेरीस आणण्यासाठी व लोकांना पक्षात घेण्यासाठी वापर झाल्याचा आरोप फेटाळून लावला.

राज्यातील भाजप-शिवसेना सरकारच्या पाच वर्षांंतील कामगिरीचा आढावा घेत पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार निवडून येईल, असा दावाही जावडेकर यांनी केला. भाजप तपास यंत्रणांच्या कामात हस्तक्षेप करत नाही. २०१२ मध्ये मी व हंसराज अहिर यांनी कोळसा घोटाळ्यात याचिका दाखल केली. नंतर न्यायालयाने सर्व खाणींचे वाटप रद्द केले. काही काळाने या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने खटला बंद करण्याबाबतचा अर्ज न्यायालयात केला. आम्ही दोघे केंद्रीय मंत्री असतानाही आम्ही सीबीआयच्या विरोधात भूमिका घेऊन तपास सुरू ठेवावा, असे प्रतिज्ञापत्र सादर केले. आधीच्या कॉंग्रेस सरकारमध्ये नेत्यांच्या केबिनमध्ये तपास यंत्रणांचे प्रतिज्ञापत्र तयार व्हायचे, असे जावडेकर यांनी सांगितले.