मुंबईत आता पावसाने विश्रांती घेतली आहे पण काल रात्रीपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत आज सकाळी अनेक भागात पाणी साचले होते. मुंबईच्या रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. त्यामुळे मुंबईच्या वेगाला ब्रेक लागला पण मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या मते मुंबईला कुठेही ब्रेक लागला नाही. मुंबईत कुठेच पाणी साचले नाही असा दावा विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला. उलट त्यांनी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना चांगले काम केल्याचे प्रशस्तीपत्रकच दिले आहे.

मुंबईत कुठेही पाणी तुंबल नाही काही दुर्घटना घडल्या पण त्यामध्ये जिवीतहानी झाली नाही हे सुदैव असे महाडेश्वर म्हणाले. मी सकाळापासून मुंबईत फिरतोय पण मला कुठेही पाणी तुंबलेले दिसले नाही. काही ठिकाणी पाणी थोडस साचलं होतं पण ते काढून टाकण्यात आलं अस ते म्हणाले. महापालिकेते अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत असे त्यांनी सांगितले.

मुंबईत गेल्या २४ तासात सर्वाधिक २३१ मिमि पावसाची नोंद झाली. जून महिन्यात इतक्या मोठया प्रमाणावर कोसळलेल्या पावसामुळे महापालिकेचे सर्वच दावे वाहून गेले पण महापौर हे मान्य करायला तयार नाहीत. मुंबईत आज तिन्ही मार्गावरील रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.

पाणी साचल्यामुळे मुंबईतल्या महत्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. नेहमीप्रमाणे हिंदमाता, सायन, चेंबूर, कुर्ला, खार, मिलन सबवे या भागात पाणी साचले. त्याचे फोटोही लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण ऐवढे सर्व होऊनही मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या मते मुंबईत मुंबईत पाणी साचलचं नाही.