वाहतुकीमुळे प्रदूषणात वाढ; उल्हासनगर सर्वाधिक प्रदूषित

वाहतुकीमुळे शहरांमध्ये सर्वाधिक ध्वनिप्रदूषण होत असल्याचे ‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थे’ने (नीरी) केलेल्या पाहणीत आढळून आले असून यात मुंबई, ठाणे, पुणे ही शहरे अग्रस्थानी आहेत. यात नीरीने २७ शहरांची पाहणी केली. लक्षणीय बाब म्हणजे मुंबई-ठाण्यापेक्षा या महानगरांना लागून असलेल्या उल्हासनगर, मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये आवाजाची पातळी खूपच असल्याचे आढळून आले आहे. या ठिकाणी आवाजाची मर्यादा ८५ ते ९० डेसिबलपर्यंत आढळून आली आहे. उच्च न्यायालयातील एका सुनावणीप्रकरणी ‘नीरी’ने ही पाहणी केली होती.

दिवसा उल्हासनगरमध्ये ध्वनिप्रदूषण अधिक होत असल्याचे आढळून आले आहे. या वेळी येथे ९१.४ डेसिबल आवाजाची नोंद झाली आहे. सर्वात कमी ध्वनिप्रदूषण धुळ्यात होत असून तिथे ७२ डेसिबलपर्यंत आवाजाची नोंद झाली आहे. येथे रहिवासी परिसरात आवाजाची मर्यादा दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल इतकी आहे. आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी शनिवार-रविवारी रात्री मुंबईच्या तुलनेत उल्हासनगरमध्ये जास्त ध्वनिप्रदूषण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑगस्ट २०१६ मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नीरीने २७ शहरातील ध्वनिप्रदूषणाची पातळी तपासली. मंगळवारी उच्च न्यायालयात हा अहवाल सादर करण्यात आला. अहवालात गाडय़ांच्या हॉर्नमुळे सर्वात जास्त प्रदूषण होत आहे. अद्यापही विनाकारण हॉर्न वाजवू नये या सुचनेकडे दुर्लक्ष केले जात आहे. ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी काम करण्याची गरज आहे, असेही सांगण्यात आले आहे. ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक पर्यायही सुचवण्यात आले आहेत. ध्वनी प्रदूषण तपासण्यासाठी सकाळी ६ ते १० आणि रात्री १० ते सकाळी ६ पर्यंतची वेळ ठरवण्यात आली होती.

अहवालातील ठळक मुद्दे

  • वाहतुकीमुळे होणारे ध्वनिप्रदूषण कमी करण्याकरिता उपाय
  • वाहनाचा वेग आणि आवाज यावर नियंत्रण मिळवणारे तंत्र विकसित करणे.
  • वाहनात ‘नॉईज एटीएम’ बसविणे. ज्यामुळे वाहकाने किती वेळा हॉर्न वाजवला ते कळेल.
  • कर्कश व विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्यांवर कारवाई करणे
  • सायलेन्सर नसलेल्या वाहनांवर कारवाई करणे.
  • रुग्णवाहिकेने लाल रंगाचा दिवा (बीम) वापरावा, सायरन वाजवू नये.

ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी..

  • बाल्कनी आणि खिडक्या अशा पद्धतीने बांधणे की वाहतूक कोंडीचा आवाज कमी येईल.
  • स्वयंपाकगृह, न्हाणीघर आधी रस्त्यालगत असावेत, तसेच शयनगृह किंवा अन्य खोल्या विरुद्ध बाजूला असाव्या. घराच्या बांधकामासाठी आवाजाला प्रतिबंध करणारे घटक वापरावे.
  • इमारतीच्या आजूबाजूला बगीचा आणि भिंतीवर वेली वगैरे सोडून आवाजाला रोखू शकता.
  • घरांच्या भिंती ध्वनीला अडथळा आणणाऱ्या (साऊंड प्रूफ) असाव्या.