मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; ‘शांतता क्षेत्र’ सध्या अस्तित्वातच नाही
उत्सव साजरे करण्यासाठी ध्वनिवर्धकाचा वापर करताना आवाजाच्या डेसिबलची मर्यादा व ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळावेच लागतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. नियम व कायद्याचे उल्लंघन न करता उत्साहाने उत्सव साजरे करावेत, असे आवाहन फडणवीस यांनी केले. दरम्यान, राज्य सरकारने ‘शांतता क्षेत्रे’ नव्याने जाहीर केली नसल्याने आधीची शांतता क्षेत्रे अस्तित्वात असल्याचा निष्कर्ष काढून ध्वनिवर्धकांचा वापर करण्यावर उच्च न्यायालयाने घातलेल्या र्निबधांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्य सरकारची भूमिकाच तूर्तास मान्य केली आहे. ध्वनिप्रदूषणाच्या मुद्दय़ावरून राज्य सरकारने न्यायमूर्ती अभय ओक यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला होता व त्यावर वाद झाल्याने हे प्रकरण त्यांच्या अध्यक्षतेखालील पूर्णपीठाकडे गेले होते. शांतता क्षेत्र जाहीर करण्याचा अधिकार याआधी स्थानिक स्वराज्य संस्थांना होता, तो केंद्र सरकारने अधिसूचना काढून राज्य सरकारला दिला. त्यानुसार राज्य सरकारने अजून शांतता क्षेत्रे जाहीर केलेली नाहीत. या क्षेत्रात ध्वनिवर्धकांचा वापरच करता येत नाही. रुग्णालय, न्यायालय, शाळा आदींच्या परिसरात शांतता क्षेत्रे जाहीर करण्यात आली होती.
सरकारने नव्याने क्षेत्रे जाहीर न केल्याने कोठेही ही क्षेत्रे नाहीत, हा सरकारचा युक्तिवाद अमान्य करून तोपर्यंत आधीची शांतता क्षेत्रे अस्तित्वात आहेत, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला होता व केंद्राच्या अधिसूचनेस स्थगिती दिली होती.
आवाजाची मर्यादा ओलांडल्यास कारवाई
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ध्वनिवर्धकांच्या वापरावर कोणतेही निर्बंध आता नाहीत, असा समज पसरलेला आहे. मात्र गृह खात्याच्या उच्चपदस्थांनी तशी वस्तुस्थिती नसल्याचे स्पष्ट केले. कोणालाही, कोठेही, कितीही आवाजात ध्वनिवर्धकांचा वापर करता येणार नाही. त्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यकच राहील. त्यामुळे ध्वनिवर्धकांचा वापर करताना आवाजाची मर्यादा ओलांडल्यास पोलिसांकडून कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 5, 2017 4:02 am