मदत न मिळाल्यास नाटय़प्रयोग करणार नाही

मुंबई : करोना काळात नाटकांवर पडदा पडल्याने उपासमारीची वेळ आलेल्या रंगमंच कामगारांनी असहकाराचा पवित्र घेतला आहे. राज्य सरकार रंगमंच कामगारांना अर्थ सहाय्य करणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कोणतेही नाटय़प्रयोग रंगमंच कामगार करणार नाहीत, अशी भूमिका कामगार संघाने घेतली आहे.

करोना सुरू झाल्यापासून आतापर्यंत राज्य सरकारने नाटकाकडे पाठ फिरवली आहे. गेल्या दीड वर्षांत केवळ मदतीचे आश्वासन देऊन त्यांनी बोळवण केली. एप्रिल महिन्यात झालेल्या बैठकीतही लवकरच मदत जाहीर करू , असे सांगण्यात आले होते. एवढेच नव्हे तर काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी मनोरंजन विश्वाशी संवाद साधला होता, त्यावेळी आमची बाजू मांडण्याची संधीही आम्हाला दिली गेली नाही. सरकारची आमच्याप्रती उदासीन भूमिका असेल तर आम्ही आमची कैफियत कुणाला ऐकवायची, आम्हाला वाली कोण, असा प्रश्न रंगमंच कामगारांनी केला आहे

यासंदर्भात बैठक घेऊन कामगारांनी असहकार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुरुवारी त्यांनी आपल्या मागण्यांचे पत्र अखिल भरतील नाटय़ परिषद या मातृसंस्थेशी जोडलेल्या विविध संस्थांना तसेच शासन दरबारीही दिले. त्यात ७५० रंगमंच कामगारांना नाटय़ व्यवसाय सुरळीत होईपर्यंत दरमहा ५ हजार रुपये अर्थसहाय्य करावे. तसेच नाटय़गृहांची दारे जिल्हानिहाय न उघडता सरसकट एकच नियम सर्वांना लावून राज्यभरातील खुली करावीत, अशा प्रमुख मागण्या त्यांनी केल्या आहेत. या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत नाटय़प्रयोग करण्यासाठी एकही कामगार पुढे जाणार नाही, अशी माहिती संघातील सभासदांनी दिली.

हे पाऊल नाईलाजाने उचलावे लागले आहे. शासनाने गेल्या वर्षीपासून केवळ आश्वासन दिले, कृती मात्र केली नाही. म्हणून आज मदतीचा अट्टाहास करावा लागतो आहे. हा व्यवहार पारदर्शक राहण्यासाठी कामगारांचे बँक खाते क्रमांक आणि सर्व तपशील आम्ही राज्य सरकारला द्यायला तयार आहोत. फक्त लवकरात लवकर ही मदत लागू करावी, एवढीच आमची अपेक्षा आहेत.

रत्नकांत जगताप ,प्रवक्ते – रंगमंच कामगार संघ