भाजपात आम्ही कोणालाही धाक दाखवून किंवा प्रलोभन देऊन प्रवेश दिलेला नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टोलेबाजीला उत्तर दिलं आहे. हे सांगतानाच त्यांनी भाजपा म्हणजे काही धर्मशाळा नाही, जी चांगली माणसं आहेत त्यांनाच आम्ही भाजपात प्रवेश दिला आहे असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. महाजनादेश यात्रा उद्यापासून सुरु करतो आहे. पुन्हा एकदा युतीचं सरकार येणार आहे, शिवसेना भाजपा आणि मित्र पक्षांची युती अभेद्य आहे असेही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या दिग्गज नेत्यांनी प्रवेश केला. या प्रवेशाच्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.

राज्यात पुन्हा एकदा युतीचं सरकार येईल असाही विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं. आमच्या पक्षात जेव्हा इतर पक्षातले लोक येत आहेत तेव्हा आम्ही स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवू अशा चर्चा काही प्रसारमाध्यमांकडून केल्या जात आहेत. मात्र त्यात काहीही तथ्य नाही असेही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. आगामी काळात भाजपा आणि शिवसेनेत काही लोकांचे प्रवेश होताना दिसतील. आम्ही चांगल्या माणसांनाच पक्षात प्रवेश दिला आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आज मुंबईतल्या एका सोहळ्यामध्ये राष्ट्रवादीचे मधुकर पिचड, वैभव पिचड, शिवेंद्रराजे, चित्रा वाघ, संदीप नाईक या सगळ्यांनी भाजपात प्रवेश केला. तर काँग्रेसचे नेते कालिदास कोळंबकर यांनीही भाजपात प्रवेश केला. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री विरोधी पक्षातल्या नेत्यांवर पक्षांतरासाठी दबाव आणत आहेत असा आरोप केला होता. मात्र धाक दाखवून पक्षात घ्यायचे दिवस कधीच गेले असं प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. सत्ता युतीचीच येणार आहे आता फक्त बहुमताचे रेकॉर्ड कसे होते ते पाहायचे आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.