महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबईमध्ये २०० महिला पोलीस कमांडो एक महिन्यात तैनात करण्यात येणार असून ५०० वायरलेस जीपगाडय़ा राज्यातील प्रमुख शहरांमध्ये तैनात करण्यात येणार आहेत, अशी घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर विशेष पोलीस गट स्थापन करण्यात येणार असून दलितांच्या तक्रारी दाखल करून न घेणाऱ्या पोलिसांना यापुढे तेथे बडतर्फच केले जाईल, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.
लहान मुलींवरील बलात्कारांमधील वाढ आणि महिलांच्या सुरक्षेच्या मुद्दय़ावरून विरोधीच नव्हे तर सत्ताधारी आमदारांनीही विधान परिषदेत सरकारवर जोरदार टीका केली होती. विरोधी पक्षनेते विनोद तावडे, दिवाकर रावते, शोभाताई फडणवीस, नीलम गोऱ्हे यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत गृहविभाग सपशेल अपयशी ठरल्याची टीका केली. या चर्चेच्या उत्तरात गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी केलेल्या उपयायोजनांची सविस्तर माहिती दिली.
४० टक्के बलात्कार जवळच्या म्हणजेच ओळखीच्या व्यक्तींकडून होतात. २१ टक्के बलात्कारांच्या घटना शेजाऱ्यांकडून तर १८ टक्के घटनांमध्ये मित्र अथवा सहकाऱ्यांकडून बलात्कार केले जातात. ६.३४ टक्के प्रकरणांमध्ये वडील व सख्ख्या भावाकडून बलात्कार होतात, असे सांगून आर. आर. पाटील म्हणाले, सरकारने मोठय़ा प्रमाणात पोलीस भरती केली आहे. पुरेशी सुरक्षा व्यवस्थाही तैनात ठेवली आहे. परंतु घरातल्याच व्यक्तीकडून बलात्कार होतो त्यावेळी पोलीस तरी काय करणार. प्रत्येक घरात पोलिसांची नियुक्ती करता येणार नाही. मात्र प्रत्येक महिलेच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. यासाठी वायरलेस असलेल्या व महिला पोलीस तैनात असलेल्या ५०० जीप दोन महिन्यांत प्रमुख शहरांमध्ये तैनात करण्यात येतील. कोणत्याही महिलेने दूरध्वनी केल्यास तात्काळ पोलीस जीप घटनास्थळी जाईल व संबंधित महिलेला सुरक्षित ठिकाणी पोहोचवेल, असे गृहमंत्री म्हणाले.
महिलांवरील अत्याचारासंदर्भात २२ जलदगती न्यायालयांची स्थापना करण्यात येणार असून मुंबईसाठी २०० महिला कमांडोंचे विशेष पथक दुचाकीसह एक महिन्यात तैनात करण्यात येणार आहे. देशभरात महाराष्ट्रात महिला पोलिसांची संख्या सर्वाधिक असून यासाठी आपण विशेष प्रयत्न केल्याचे आर. आर. पाटील म्हणाले. देशातील कोणत्याही शहरापेक्षा मुंबईतील महिला सुरक्षित असल्याचा दावाही गृहमंत्र्यांनी केला.
आबा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
‘बडे बडे शहरों में छोटे छोटे हादसे होते है’ या विधानामुळ मागे एकदा मंत्रिपद गमावून बसलेले गृहमंत्री आर. आर. पाटील बुधवारी बलात्कारांच्या घटनांबाबतच्या विधानावरून पुन्हा वादात सापडले आहेत़  विरोधकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचा दावा करीत बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात हक्कभंग मांडणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.बलात्कारांच्या घटनांमध्ये ओळखीच्यांकडून हे प्रकार जास्त प्रमाणावर होतात. याची आकडेवारीही सादर केली. राज्यातील पोलिसांची संख्या वाढविण्यात आली असली तरी घराघरात पोलीस तैनात करणे शक्य नाही, असे मी म्हणालो़  मात्र आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला, असे स्पष्टीकरण पाटील यांनी मग विधानसभेतही केले.