– संदीप आचार्य

देशभरात अनेक ठिकाणी आता डॉक्टर व परिचारिकांना करोनाची लागण होताना तसेच करोना रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे क्वारंटाईन होण्याची वेळ येताना दिसते. मुंबई महापालिका रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिकाही याचा सामना करत असून आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या डॉक्टर- परिचारिकांचा मानसिक ताण तणाव वाढताना दिसत आहे. या साऱ्यांना मानसिक ताणातून बाहेर काढण्याबरोबरच त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

मानसिक तणावाखाली असलेल्या बहुतेक परिचारिका व डॉक्टरांमध्ये चिडचिड वाढलेली दिसून येते. कामाच्या स्वरूपावरून त्यांच्या तक्रारी वाढत आहेत. यात अन्य काही सहकाऱ्यांना कशी सुट्टी दिली गेली वा त्यांना कमी काम का वगैरे मुद्दे प्रामुख्याने उपस्थित केले जात आहेत. त्याचबरोबर करोना संरक्षित पोशाख, एन ९५ मास्कसह पुरेशी विश्रांती मिळावी ही एक प्रमुख मागणी असल्याचे दिसून येते असे राज्याच्या आरोग्य संचालक डॉ साधना तायडे यांनी सांगितले.

एक नक्कीच मान्य करावे लागेल करोनाच्या लढाईत डॉक्टर व परिचारिकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. शिवाय लागण होण्याची भीती वाटत राहाणे स्वाभाविक आहे. एकीकडे या सर्वांच्या घरची मंडळीही निश्चितच तणावाखाली असणार तर घरच्यांच्या चिंतेमुळे रुग्ण व्यवस्था सांभाळणारी यंत्रणाही अस्वस्थ होणार. यासाठी करोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व परिचारिकांच्या मानसिक स्वास्थ्याची आरोग्य विभागाकडून काळजी घेतली जात आहे. आमचे मानसोपचारतज्ज्ञ तसेच चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ आमच्या डॉक्टर व परिचारिकांचे मनोबल वाढविण्याचे काम करत आहेत. करोनाची लढाई मोठी असून यात डॉक्टरांचे मनोबल टिकवून ठेवण्यालाही विशेष प्राधान्य दिले पाहिजे असे राज्य सरकारचे मुख्य आरोग्य सल्लागार व माजी आरोग्य महासंचालक डॉ सुभाष साळुंखे यांनी सांगितले. या डॉक्टरांचे पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री ठाकरे यांनीही कौतुक केले आहे. लोकांनीही थाळीनाद करून अभिवादन केले आहे. मात्र तुमची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे याची खात्री या डॉक्टर व परिचारिकांना पटवून देण्याची जबाबदारी यंत्रणेने पार पाडली पाहिजे असे डॉ साळुंखे म्हणाले. करोनाशी लढणाऱ्या प्रत्येकाला करोना संरक्षित पोशाख, मास्क व आवश्यक वैद्यकीय सुविधेबरोबरच पुरेशी विश्रांती मिळाली पाहिजे. त्यांना घरी जाण्यासाठी योग्य व्यवस्था करून दिली पाहिजे तसेच विश्रांतीच्या काळात त्यांना तणावातून बाहेर पडण्यासाठी मनोरंजनाचीही व्यवस्था केली पाहिजे असेही डॉ साळुंखे म्हणाले. या शिवाय त्यांचे मानसिक स्वास्थ्य भक्कम राहाण्यासाठी मानसोपचारतज्ञांच्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजे. यासाठी बाहेरून तज्ज्ञ मागवलेच पाहिजे असे नाही तर संबंधित आरोग्य संस्थेतील यातील जाणकारांचा वापर केला जाऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.

माझ्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीपुढे करोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे व परिचारिकांचे मनोबल टिकवणे हाही एक मुद्दा असल्याचे डॉ संजय ओक यांनी सांगितले. यासाठी मानसोपचारतज्ञांपासून अनेकांशी आपण संवाद साधून योग्य शिफारशी अहवालात करू असेही डॉ ओक यांनी सांगितले. पालिकेच्या रुग्णालयातही अनेक डॉक्टर व परिचारिका विलगीकरणाखाली असून त्यांचे तसेच त्यांच्याकडे पाहून भीतीच्या सावटाखाली अथवा अस्वस्थ मनस्थितीत काम करणाऱ्या डॉक्टर व परिचारिकांचे मनोबल वाढवण्याला आता प्राधान्य दिले पाहिजे. थेट करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना तीन दिवसातून एक दिवस सुट्टी दिली जाते तर वॉर्डात काम करणाऱ्यांना पाच दिवसातून एक सुट्टी दिली जाते. विभागातील ज्येष्ठांकडून मनोबल वाढविण्याचे काम केले जात आहे.

एकूणच आगामी काळातील करोना लढाईचा विचार करून आमच्या डॉक्टर, परिचारिका तसेच अन्य कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आम्ही तज्ज्ञांशी सल्लामसलत करतच आहोत. लवकरच याबाबतही ठोस पावले टाकली जातील असे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. आमच्या डॉक्टरांसह सर्व कर्मचाऱ्यांची आम्ही निश्चित काळजी घेऊ व तसा विश्वासही त्यांच्या कुटुंबीयांना देऊ असेही सुरेश काकाणी यांनी सांगितले.