संदीप आचार्य 
मुंबईत करोनाच्या चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळेत आकारण्यात येणारे भरमसाठ दर कमी करण्यासाठी सरकारने नियुक्त केलेल्या समितीने २२०० रुपये व २८०० रुपये असे नवे दर निश्चित केले आहेत. समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला असून यापुढे खासगी प्रयोगशाळांची ४५०० रुपये दर आकारणी रद्द होईल. खासगी प्रयोगशाळेत करोनाच्या चाचणीसाठी साडेचार हजार रुपये मोजावे लागत असल्याने गरीब रुग्णांना ते परवडू शकत नाहीत. ही गोष्ट लक्षात घेऊन हे दर कमी करण्यासाठी शासनाने २ जून रोजी एका समितीची नियुक्ती केली.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आयसीएमआर ने राज्यात एकूण ८८ प्रयोगशाळांना करोना चाचणीसाठी मान्यता दिली आहे. यात ४९ प्रयोगशाळा या शासकीय आहेत तर ३९ खाजगी प्रयोगशाळा आहेत. शासकीय प्रयोगशाळेत करोना रुग्णांच्या मोफत चाचण्या केल्या जात असून खासगी प्रयोगशाळेत याच चाचणीसाठी साडेचार हजार रुपये दर आकारला जातो. या चाचणीसाठी लागणारे किट्स परदेशातून मागवावे लागत असल्याने चाचणीसाठी जास्त खर्च येत असल्याचा खासगी प्रयोगशाळांचा दावा आहे. मात्र आता हे किट्स भारतातही आता तयार होत असल्याने खासगी प्रयोगशाळांनी चाचणीचे दर कमी केले पाहिजे अशी भूमिका घेत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी वाटाघाटी करून दर कमी करण्यासाठी चार सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे या समितीचे अध्यक्ष असून अन्य तीन सदस्यात आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, जे जे वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अमिता जोशी व वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांचा समावेश आहे. आयसीएमआरने २५ मे रोजी सर्व राज्यांना पत्र पाठवून त्यांच्या राज्यात दर निश्चिती करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार कर्नाटक ने करोना चाचणीसाठी २२५० रुपये दर निश्चित केला तर तामिळनाडू ने २५०० रुपये व जम्मू- काश्मीर मध्ये २७०० रुपये दर निश्चित करण्यात आला.

राज्यात आतापर्यंत सहा लाखाहून अधिक करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात एकूण ५५५ प्रयोगशाळा असून राज्यात ८८ प्रयोगशाळांच्या माध्यमातून वेगाने चाचण्या केल्या जात आहेत. सुरुवातीला खासगी प्रयोगशाळांच्या चाचणीचे अहवाल मिळण्यास तीन ते सहा दिवस लागायचे मात्र आता हे अहवाल चोवीस तासाच्या आत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. देशात आज घडीला दर दहा लाख लोकांमागे २३६३ करोना चाचण्या केल्या जातात तर राज्यात हेच प्रमाण दहा लाख मागे १३,००० एवढे आहे. मुंबई व पुण्यासारख्या शहरातील वाढते करोना रुग्ण आणि आता ग्रामीण भागाकडे सरकू लागलेला करोना याचा विचार करता आगामी काळात अधिक प्रयोगशाळांना मान्यता मिळवी तसेच शासकीय प्रयोगशाळांत जास्तीजास्त चाचण्या केल्या पाहिजेत, अशी शिफारस डॉ. सुधाकर शिंदे यांच्या समितीने केली आहे.

करोना चाचणीचा दर कमी करण्यापूर्वी सर्व खासगी प्रयोगशाळांबरोबर वेबिनारद्वारे बैठक घेण्यात आली. करोनासठी सॅम्पल गोळा करण्यापासून ते चाचणीचा निकाल देईपर्यंत येणार्या प्रत्येक खर्चाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यानंतर सॅम्पल थेट आरोग्य केंद्रातून गोळा करून चाचणी करावयाची झाल्यास २२०० रुपये चाचणीसाठी आकारावे तसेच जर रुग्णाकडून रुग्णालयात जाऊन अथवा घरी जाऊन सॅम्पल घेऊन चाचणी केल्यास २८०० रुपये आकारण्यात यावे अशी शिफारस डॉ. सुधाकर शिंदे यांच्या समितीने केली आहे. या शिवाय चाचणीसाठी लागणाऱ्या रिएजंट व अन्य गोष्टींवरील जीएसटी रद्द केल्यास चाचणीचे दर आणखी कमी होतील असे या अहवालात नमूद केले आहे. या समितीचा अहवाल शासनाने लागू केल्यास करोना चाचणीसाठी ४५०० रुपयांऐवजी २८०० रुपये आकारले जातील.