आता इमारतीतील रुग्णाचे घर वा मजलाच टाळेबंद, मुंबई पालिकेचा निर्णय

मुंबई : करोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर प्रतिबंधित करण्यात येणारी संबंधित इमारत वा परिसराबाबतच्या धोरणात मुंबई महापालिकेने काही फेरबदल केले असून आता रुग्णाचे वास्तव्य असलेली इमारत किंवा तिचा काही भागच टाळेबंद करण्यात येणार आहे. नियमांच्या अंमलबजावणीत गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी करण्यात येणार आहे.

पोलीस दल आणि पालिकेतील अपुरे मनुष्यबळ लक्षात घेऊन नियमांचे काटेकोर पालन व्हावे याची जबाबदारी अशा इमारतींमधील व्यवस्थापकीय समितीच्या सदस्यांवर सोपविण्यात येणार आहे. तर प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये पोलिसांबरोबर पालिका अधिकारी, कर्मचारीही तैनात करण्यात येणार आहेत.

करोना फैलावास प्रतिबंध करण्यासाठी रुग्ण सापडल्यानंतर संबंधित विभाग वा इमारती प्रतिबंधित करण्यात येत असून तेथील नागरिकांना अन्य भागांत जाण्यास वा बाहेरील व्यक्तीस प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. आता पालिकेने प्रतिबंधित क्षेत्राबाबतच्या धोरणात काही फेरबदल केले आहेत.

आतापर्यंत रुग्ण सापडल्यानंतर सरसकट सर्वच परिसर वा संपूर्ण इमारत प्रतिबंधित करण्यात येत होती; परंतु आता एखाद्या इमारतीमध्ये एक रुग्ण किंवा संशयित रुग्ण, लक्षणे नसलेले रुग्ण आढळल्यास ती इमारत वा तिचा काही भाग (रुग्णाचे वास्तव्य असलेला मजला वा त्याचे घर) टाळेबंद करण्यात येणार आहे. अशा इमारतींमधील व्यवस्थापकीय समितीला त्याची माहिती देण्यात येणार असून इमारतीतील अन्य रहिवाशांना संसर्ग होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या याची माहिती आणि मार्गदर्शन समिती सदस्यांना करण्यात येणार आहे.

६६१ भाग प्रतिबंधित, ११० इमारती टाळेबंद

मुंबईत यापूर्वी दोन हजार ८०१ प्रतिबंधित क्षेत्रे होती. बदललेल्या धोरणानुसार ६६१ प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर करण्यात आली आहेत. या धोरणानुसार मुंबईत आता ६६१ प्रतिबंधित क्षेत्रे असून एक हजार ११० इमारती टाळेबंद आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातील मार्गावर निर्बंध घालण्यात आले असून तेथे पोलीस तैनात  आहेत. मात्र आता तेथे पोलिसांबरोबरच पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. या क्षेत्रातील व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे नियोजन पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे.

रहिवासी समितीच्या जबाबदाऱ्या 

*  किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, औषधाची दुकाने यांच्याशी संपर्क साधून वस्तू मागविण्यासाठी मदत करणे.

* दुकानदारांनी  वस्तू इमारतीच्या प्रवेशद्वारापर्यंत आणल्यानंतर त्या संबंधितांच्या घरापर्यंत पोहोचवणे.

* इमारतीत विलगीकरणात ठेवलेल्या रुग्णांनी मोबाइलमध्ये ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप डाऊनलोड केले आहे की नाही याची खातरजमा करणे.

* इमारतीत कुणाला संसर्ग झाल्यास त्याची माहिती पालिकेला तातडीने देणे.