मुंबई : करोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे प्रतिबंधित असलेल्या इमारतीमधून वारंवार बाहेर पडणाऱ्या, पालिके च्या विभाग कार्यालयाची वारी करणाऱ्या एका रहिवाशाविरोधात पालिकेने पोलिसात गुन्हा नोंदविला आहे. टाळेबंदीचे नियम धुडकावल्याप्रकरणी झालेली ही मुंबईतील पहिलीच कारवाई आहे. संबंधित रहिवाशाने मात्र करोना रुग्णांच्या उपचारासाठी आयुक्तांशी संपर्क साधला म्हणून आकस ठेवून कारवाई केल्याचा आरोप केला आहे.

बोरिवली (पश्चिम) येथील साईबाबा नगरमधील जे. बी. खोत हायस्कूलजवळील राजेश नगर को-ऑप. हौसिंग सोसायटीत करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे ही इमारत प्रतिबंधित करण्यात आली आहे. या इमारतीच्या ‘बी’ विंगमध्येही करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे इमारतीमधील रहिवाशांना बाहेर जाण्यास अथवा बाहेरच्या व्यक्तीला इमारतीत येण्यास मज्जाव करण्यात आला. तरीही इमारतीतील रहिवासी रवी नायर वारंवार इमारतीबाहेर पडत असल्याचे पालिकेच्या आर-मध्य विभागातील कनिष्ठ आवेक्षक घनकचरा व्यवस्थापक प्रवीण मिस्त्री यांच्या निदर्शनास आले होते. इमारतीबाहेर जाऊ नये, अशी विनंती पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना अनेक वेळा केली. नायर एकदा ‘आर-मध्य’ विभाग कार्यालयात पोहोचले.

अखेर ‘आर-मध्य’ विभाग कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रवीण मिस्त्री यांनी संबंधित रहिवाशाविरोधात बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. टाळेबंद इमारतीमधील व्यक्ती अतिजोखमीच्या गटात मोडले जातात. करोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन अशा व्यक्तीला संस्थात्मक वा गृह विलगीकरणात ठेवण्यात येते. मात्र अनेक वेळा सांगितल्यानंतरही नायर ऐकत नसल्यामुळे त्यांच्याविरुद्ध बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवावा लागला, असे ‘आर-मध्य’ विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

रवी नायर यांनी कारवाईला विरोध दर्शविताना काही कामानिमित्त आपण साहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांच्याशी संपर्क साधत होतो. परंतु त्यांच्याशी संपर्क होत नसल्याची बाब पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या कानावर घातली. त्याचा राग मनात धरून आपल्यावर ही कारवाई के ल्याचा दावा के ला आहे.

‘आपण आतापर्यंत १५० करोनाबाधित आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांना मदत केली आहे. दहिसर आणि गोरेगाव येथील करोना केंद्रात रुग्णांना दाखल करण्यासाठी धावपळ केली. त्यासाठी खासदार आणि नगरसेविकेच्या कार्यालयातही जावे लागे. १० रुग्ण असल्यास इमारत प्रतिबंधित केली जाते. आमच्या इमारतीत तळमजल्यावर दोन व चौथ्या मजल्यावर एका रुग्णाचा विलगीकरण काळ पूर्ण होत आहे, तर अन्य चौघांना करोनाची बाधा झाली आहे. असे असतानाही संपूर्ण इमारत प्रतिबंधित केल्याची तक्रार त्यांनी केली.

३३ हजार इमारती मुक्त

आतापर्यंत मुंबईमधील ४३,२२० इमारती करोनाबाधित रुग्ण सापडल्याने प्रतिबंधित करण्यात आल्या होत्या. मात्र टाळेबंदीचा काळ पूर्ण झाल्यानंतर एकही नवा रुग्ण न सापडल्यामुळे  ३३,११४ इमारती प्रतिबंधमुक्त करण्यात आल्या आहेत.  सध्या १०,१०६ इमारतींपैकी काही अंशत:, तर काही पूर्णपणे प्रतिबंधित आहेत. या इमारतींमधील रहिवासी बाहेर जाऊ नये अथवा बाहेरील व्यक्ती इमारतीत जाऊ नये तसेच संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये या दृष्टीने विविध उपाययोजना करण्याच्या सूचना इमारतींमधील रहिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

राजेश नगर को-ऑप. हौसिंग सोसायटीत सातत्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा वेळी समाजाबाबतची बांधिलकी लक्षात घेऊन टाळेबंद इमारतीमधील रहिवाशांनी घरातच थांबायला हवे. बेजबाबदारपणे इमारतीबाहेर फिरणाऱ्या रहिवाशाविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंदवावा लागला.

– भाग्यश्री कापसे, साहाय्यक आयुक्त, ‘आर-मध्य’

४.६६ लाख मुंबईकर गृहविलगीकरणात

मुंबई : मुंबईमधील २,१५,४८५ करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या तब्बल ३१,७८,००३ संशयित रुग्णांचा शोध घेण्यात पालिकेला यश आले असून यापैकी तब्बल २७,०९,५५९ रुग्णांनी विलगीकरणाचा काळ पूर्ण केला आहे. तर सध्या ४,६६,९२४ संशयित रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

संस्थात्मक विलगीकरणासाठी मुंबईतील १७,५३५ खाटांची क्षमता असलेली ४२ करोना काळजी के ंद्र-१ आणि ३,१७८ खाटांची क्षमता असलेली २५ करोना काळजी के ंद्र-२ सुरू आहेत. तिथे अनुक्रमे १,५६० आणि १,७१६ रुग्ण दाखल आहेत. एका करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील ३० व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना विलगीकरणात ठेवण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश आहेत. त्यानुसार ३१,७८,०४३ संशयित रुग्णांचा शोध घेण्यात आला. यापैकी बाधितांच्या थेट संपर्कातील १२,९३,४१० जणांचा अतिजोखमीच्या गटात तर उर्वरित १८,८४,६३३ व्यक्तींचा कमी जोखमीच्या गटात समावेश आहे. यांपैकी काही संशयित रुग्णांना  गृहविलगीकरणात ठेवण्यात आले. २७,०९,५५९ संशयित रुग्णांनी आपला विलगीकरणाचा काळ पूर्ण केला आहे.