|| प्रसाद रावकर

..पण, घरातच वेगळ राहण्याची वेळ ओढवली

 

मुंबई : मायदेशाची ओढ लागल्याने सुट्टी घेऊन कुटुंबासह मुंबईत दाखल झालेल्या एका तरुणाला अवघ्या काही दिवसांतच दुबईतील खासगी कंपनीच्या कार्यालयातून दूरध्वनी आला. तात्काळ येण्याची सूचना मिळताच या तरुणाने १६ मार्चला दुबई गाठली. पण दुबईत पोहोचताच कंपनीने १४ दिवस घरातच राहण्याचे फर्मान सोडले. घरात वेगळे राहण्याच्या आदेशाचा उल्लंघन करणाऱ्यांना मोठा दंड आणि कारावासाची शिक्षा असल्यामुळे हा तरुण घरातच आहे.

गेली काही वर्ष मुंबईमधील अशोक सावंत (नाव बदललेले आहे) हा तरुण दुबईमधील एका खासगी कंपनीत काम करीत आहेत. काही दिवसांची सुट्टी घेऊन तो आपल्या कुटुंबासह मुंबईत दाखल झाला होता. अशोक ३१ मार्च रोजी दुबईमधील कंपनीत रुजू व्हायचे होते.

दरम्यानच्या काळात जगातील विविध देशांमध्ये करोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली होती. मुंबईमधील करोनाबाधित आणि संशयीतांची संख्या वाढत होती. दुबईतही रुग्ण आढळत असल्याचे वृत्त अधूनमधून मिळत होते. त्यामुळे अशोकसमोर मोठे संकट उभे राहिले. तेवढय़ात कंपनीतून कार्यालयात हजर राहण्याचे फर्मान मिळाले.

त्यामुळे पत्नी आणि मुलाला मुंबईतच ठेऊन अशोकने १६ मार्च रोजी दुबई गाठली आणि कार्यालयात हजर झाला. मात्र १४ दिवस घरात वेगळे राहावे, घरातून बाहेर पडू नये, असे आदेश कंपनीतून देण्यात आले. त्यामुळे तो दुबईतील स्वत:च्या घरात पोहोचला.

घरामध्ये वेगळे राहण्यास सांगितलेली व्यक्ती रस्त्यावर फिरताना आढळल्यास दुबईत कडक शिक्षा केली जाते. घरात राहण्याचे आदेश धुडकावणाऱ्यांना १० हजार दिऱ्हाम दंड आणि तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा करण्यात येत आहे.

त्यामुळे घरात वेगळे राहण्यास सांगितलेले संशयीत रस्त्यावर फिरताना दिसत नाही. आता याच आदेशांचे मलाही पालन करावे लागत आहे. १६ मार्चपासून मीही घरातच आहे. केवळ माझ्याच नव्हे, तर समाजाच्या भल्यासाठी तसे करावे लागत आहे, असे अशोकने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

मुंबईला येते वेळी घरातील सर्व जिन्नस संपवले होते. आता घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे केवळ सुपर मार्केटमधून फोनवरुन वस्तू मागविण्यापलिकडे दुसरा पर्यायच नाही. मात्र कडक नियमांमुळे वस्तू घेऊन येणाऱ्याला घरी येता येत नाही. सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांकडे वस्तू देऊन तो परततो.

तेथून या वस्तू घरी आणाव्या लागतात. मात्र रस्त्यावर फिरण्यास पूर्ण बंदी आहे. तसे केल्यास मलाही शिक्षा होऊ शकते. इतरांची सुरक्षा रक्षात घेऊन घरीच बसणे योग्य आहे. भारतातही ज्यांना घरात वेगळे राहण्यास सांगितले आहे, त्यांनीही घराबाहेर पडू नये, अशी कळकळीची विनंती त्याने केली आहे.