महापालिकेने २००७पासून धोकादायक ठरवूनही सांताक्रूझमधील ‘शंकरलोक’ ही इमारत न्यायालयीन वादात अडकल्याने तगून होती. इमारत बहुतांश रिकामीच होती, पण ती बाजूच्या वस्तीवर कोसळल्यानेच जीवितहानी वाढली. या दुर्घटनेमुळे मुंबईतील जुन्या इमारतींचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
दुर्घटनाग्रस्त शंकरलोक इमारतीच्या शेजारीच २२ घरांची वस्ती होती. टाकीचा भाग पडल्याने या वस्तीतील एका बाजूची सर्व घरे कोसळली व समोरच्या बाजूच्या घरांची पडझड झाली. साडेअकराची वेळ असल्याने अनेकजण कामानिमित्त बाहेर होते व त्यामुळे मोठय़ा प्रमाणावरील मनुष्यहानी टळली. पारधी कुटुंबीय मात्र तेवढे सुदैवी नव्हते.
ही इमारत ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. महापालिकेने २००७ मध्ये ही इमारत धोकादायक घोषित केली होती. २००८ व २०१० मध्ये पुन्हा नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र हे प्रकरण न्यायालयात गेले व कारवाईला स्थगिती देण्यात आली. इमारत पडून दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी याचिकाकर्त्यां संध्या श्रीधरन यांच्यावर राहील, असे पालिकेतर्फे न्यायालयात सांगण्यात आले होते, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख म्हणाले.
संध्या श्रीधरन या वकील महिलेने घर सोडण्यास नकार दिला होता. इमारत धोकादायक नसून केवळ बिल्डरला देण्यासाठी पालिका कारवाई करत आहे, असा त्यांचा आरोप होता. त्यांनी न्यायालयात याचिका करून कारवाईवर स्थगिती आणली होती. ही स्थगिती आणली नसती तर आजची दुर्घटना टाळता आली असती, असा आरोप नगरसेविका सुनयना पोतनीस यांनी केला. पालिकेने वस्तीतील लोकांनाही घरे रिकामी करण्यास सांगितली होती. पण शहरातील घरांच्या किंमती पाहता कोणीही घर सोडायला तयार झाले नाही, असेही त्या म्हणाल्या.
मी कामासाठी बाहेर गेलो होतो, मुलगाही बाहेर होता, मात्र बायको ढिगाऱ्याखाली अडकली, असे सांगताना कांतीलाल पटेल यांना अश्रू आवरत नव्हते. टाकीमुळे घराच्या भिंतीला उभा तडा गेला तेव्हा घरात भाऊ व त्याची १६ वर्षांची मुलगी होती. भावाच्या डोक्याला थोडे लागले. मी कामासाठी व आई भाजी आणण्यासाठी बाहेर गेल्याने बचावलो, असे फ्लोरी डिसील्व्हा म्हणाल्या.

अपुऱ्या जागेमुळे मदतकार्यात अडचणी
ग्रॅण्ड हयात हॉटेलमागे असलेल्या यशवंतनगरमध्ये बैठय़ा चाळी, रस्त्याकडेला उभ्या राहिलेल्या टपऱ्या व त्यांच्या आतमधल्या बाजूला बांधलेल्या इमारती आहेत. शुक्रवारी पडलेल्या इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी लहान गल्लीमधून दोन इमारती ओलांडून पोहोचावे लागत होते. या इमारतीच्या लगत बांधलेल्या इमारतींमध्ये सहा मीटरचे अंतरही ठेवण्यात आले नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत तिथे काय भीषण अवस्था होईल, याची कल्पनाही करता येत नाही. अग्निशमन दलाच्या गाडय़ा दुर्घटनास्थळी त्वरित आल्या असल्या तरी त्यांना इमारतीबाहेर असलेल्या लहान गल्लीपर्यंतही जाता आले नाही आणि मदतकार्यात अडथळे आले.