दूरचित्रवाणीवर एकाच दिवशी ‘पद्मावत’, ‘धडक’ आणि ‘गुलाबजाम’

मोठय़ा पडद्यावर फारशा न चाललेल्या चित्रपटांना दूरचित्रवाणीवर जोरदार प्रतिसाद मिळाल्याचा अनुभव लक्षात घेऊन छोटय़ा-मोठय़ा चित्रपटांच्या ‘वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर’च्या निमित्ताने वाहिन्यांमध्ये पुन्हा एकदा टीआरपी खेळी रंगणार आहे. ३० सप्टेंबरला ही रस्सीखेच पाहता येईल.

संजय लीला भन्साळी यांचा या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा आणि अनेक वादांतून, संघर्षांतून तावून सुलाखून बाहेर पडलेला चित्रपट ‘पद्मावत’ आणि निर्माता करण जोहर यांचा ‘धडक’ चित्रपट हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी छोटय़ा पडद्यावर झळकणार आहेत. त्याचबरोबर मराठीत प्रेक्षकपसंतीस उतरलेला ‘गुलाबजाम’ हा चित्रपट ३० सप्टेंबरलाच दूरचित्रवाणीवर पहिल्यांदा पाहता येणार आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षकांसाठी तीन चित्रपटांची आणि हिंदी भाषिकांसठी दोन चित्रपटांची पर्वणी असणार आहे. याच दिवशी अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर या सुपरस्टार जोडीचा ‘१०२ नॉट आऊट’ हाही चित्रपट दाखवला जाणार होता; परंतु याचे दूरचित्रवाणीवरील प्रदर्शन आता लांबले असल्याचे कळते आहे. त्यामुळे ३० सप्टेंबरला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरचे युद्ध कलर्स हिंदी, झी सिनेमा आणि झी मराठी या तीन वाहिन्यांमध्ये रंगणार आहे.

बार्कच्या (ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल) टीआरपीच्या आकडेवारीनुसार या वर्षी ‘वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर’ पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत सातत्याने वाढ नोंदवली गेली आहे.

‘बागी २’, ‘सोनू के टिट्टू की स्वीटी’, ‘पॅडमॅन’, ‘टॉयलेट एक प्रेमकथा’, ‘परमाणू’, ‘रेड’, ‘फास्टर फेणे’ यांसारखे चित्रपट दूरचित्रवाणीवर पहिल्यांदा दाखविले गेले आहेत. त्यांना दर्शकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. ‘सोनू के..’सारख्या मोठय़ा पडद्यावर फारशा न चाललेल्या चित्रपटालाही दर्शकांची पसंती लाभली होती. हे चित्रपट दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा दाखवले गेले, तेव्हाही ते प्रेक्षकांनी पाहिल्याची बार्कची आकडेवारी सांगते.

बार्कच्या अहवालानुसार गेल्या दोन वर्षांत स्टार गोल्ड वाहिनीने सर्वात जास्त वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर करून प्रेक्षकसंख्या स्वत:कडे खेचली. अर्थात वाहिन्यांच्या या युद्धात प्रेक्षकांना मात्र त्यांचे आवडते चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहेत. शिवाय त्यांना चित्रपटनिवडीची संधीही मिळणार आहे.