|| समीर कर्णुक

उत्तर प्रदेश, बिहारच्या रेल्वे गाडय़ांतील तिकिटांसाठी तोबा गर्दी; मुंबईत प्रादुर्भाव वाढण्याची भीती, कुटुंबीयांकडून परतीचे आर्जव

करोनाच्या प्रादुर्भावामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ठप्प होण्याच्या मार्गावर असताना मुंबईच्या अर्थकारणातील महत्त्वाचा घटक बनलेला उत्तर प्रदेश, बिहारमधील कामगारवर्गही आता धास्तावला आहे. एकीकडे व्यवहार बंद होत चालल्याने ओढवलेले तात्पुरत्या बेरोजगारीचे संकट तर दुसरीकडे ‘करोना’चा संसर्ग होण्याची भीती यांमुळे या मजूर वर्गातील बहुसंख्य परप्रांतीय आपापल्या गावी जात आहेत. परिणामी लोकमान्य टिळक टर्मिनससह अनेक रेल्वे स्थानकांवर सध्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या तिकिटांसाठी रांगा लागल्या आहेत. याउलट उत्तरेकडून मुंबईत येणाऱ्या रेल्वेगाडय़ा मात्र, रिकाम्या धावत असल्याचे चित्र आहे.

संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेल्या करोनाने मुंबईतदेखील सध्या हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. मुंबई शहर मोठय़ा प्रमाणात गजबजलेले असल्याने या ठिकाणी अधिक प्रमाणात हा आजार पसरण्याची भीती या ठिकाणी काम करणाऱ्यांमध्ये आहे. तसेच जर हा आजार वाढल्यास गावाकडे जाणाऱ्या गाडय़ादेखील बंद होतील अशी शंका या कामगारांमध्ये आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर राज्यांतील कामगारांनी सध्या आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी सध्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथून उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या  सर्वच गाडय़ा फुल्ल होऊन जात आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी आठ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत या दोन्ही राज्यांमध्ये आठ ते दहा गाडय़ा जातात. यामध्ये सकाळच्या वेळी गोदान, भागलपूर, कामयानी, वाराणसी या चार गाडय़ा तर आठवडय़ाला सुटणाऱ्या इतर गाडय़ा अशा सहा ते सात गाडय़ा येथून दुपारी बारा वाजेपर्यंत सुटतात. त्यामुळे सध्या येथील सर्व स्थानके प्रवाशांनी गजबजून गेली आहेत. जोपर्यंत करोनाचा कहर कमी होणार नाही, तोपर्यंत गावाकडून येणार नाही अशी प्रतिक्रिया या वेळी काही प्रवाशांनी दिली आहे.

तर प्रवाशांच्या आरोग्याची पूर्ण काळजी टर्मिनसवर घेतली जात असून दर दोन तासांनी आसन, लिफ्ट, सरकते जिने, विश्रांतिगृह येथील सफाई करून औषधफवारणी करण्यात येत आहे. तसेच येणाऱ्या प्रवाशांना तपासूनच बाहेर सोडण्यात येत असल्याची माहिती टर्मिनसचे मुख्याधिकारी एस. एम. सोनावणे यांनी दिली आहे.

फलाट तिकीट विक्रीत घट

प्रवाशांना रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी येणारे नातेवाईक फलाटावर मोठय़ा प्रमाणात गर्दी करत असल्याने, याने संक्रमण होण्याची अधिक भीती होती. त्यामुळे सरकारने दोन दिवसांपूर्वी फलाट तिकीटचा दर दहा रुपयांवरून पन्नास रुपये इतका केला आहे. याचा मोठा परिणाम लोकमान्य टिळक टर्मिनसवर पाहायला मिळत आहे. १६ मार्चला लोकमान्य टिळक टर्मिनसवर १० हजार ६८४ इतक्या जणांनी फलाट तिकिटे काढली होती. मात्र तिकीट दर वाढल्यानंतर १८ मार्चला केवळ ६ हजार ८७२ इतक्याच तिकीटची विक्री झाली. हा आकडा मागच्या वर्षी १८ मार्च २०१९ ला १२ हजार ८९० इतका होता. यावरून फलाटावर येणाऱ्यांची संख्या अध्र्याहून अधिक कमी झाल्याचे दिसून येत आहे.