अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पालिका चालकाच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश मोटार वाहन अपघात दावा लवादाने एका विमा कंपनीला दिले आहेत. गेल्या काही वर्षांतील ही सर्वाधिक मोठी भरपाईची रक्कम आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात विमा योजनेच्या शर्थीचा मोटारसायकल मालकाकडून भंग झाल्याने नुकसानभरपाईची ही रक्कम कंपनीने त्याच्याकडून वसूल करण्याचेही लवादाने स्पष्ट केले.

ज्या वेळी पालिकेच्या या चालकाचा अपघाती मृत्यू झाला, त्या वेळी त्याचे मासिक वेतन हे ६८ हजार रुपये एवढे होते. त्यामुळे त्याचा असा अपघाती मृत्यू झाला नसता तर त्याचे भविष्यात वेतन किती असते यावरून लवादाने नुकसानभरपाईची रक्कम ठरवत ती देण्याचे आदेश दिले.

रामचंद्र झोरे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून २७ मार्च २०१३ रोजी नागपाडा परिसरात रस्ता ओलांडताना एका १८ वर्षांच्या मोटारसायकल चालकाने दिलेल्या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर ५ एप्रिल रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. परवाना नसतानाही मोहम्मद अश्रफ कुरेशी हा या मोटारसायकल चालवत असल्याचे नंतर उघड झाले. त्यामुळे अश्रफ आणि मोटारसायकलचा मालक खुबलाल प्रजापती यांच्या निष्काळजीपणामुळे झोरे यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी त्या दोघांवर गुन्हा दाखल केला.

अश्रफकडे वाहन चालवण्याचा परवाना नाही याची पूर्ण जाणीव असतानाही मोटारसायकलचा खुबलाल प्रजापती याने त्याला ती चालवण्यास परवानगी दिली होती. हा विमा कंपनीच्या शर्थीचा भंग आहे आणि त्यामुळेच विमा कंपनी नुकसानभरपाई देण्याच्या उत्तरदायित्वातून मुक्त होते, असे लवादाने निकालात म्हटले आहे. त्याचमुळे झोरे यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारी नुकसानभरपाईची रक्कम मोटारसायकल मालकाकडून वसूल करण्याचेही स्पष्ट केले. मोटारसायकल मालकाकडून ही रक्कम वसूल करण्यासाठी स्वतंत्र दावा करण्याची गरज नाही, असेही लवादाने म्हटले आहे.

झोरे यांची पत्नी प्रणाली (४२) आणि १० व पाच वर्षांच्या दोन मुलांनी मोटार वाहन अपघात दावा लवादात नुकसानभरपाईसाठी धाव घेतली होती. याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा, घटनास्थळाचा केलेला पंचनामा, झोरे यांचा शवविच्छेदन अहवाल या कागदपत्रांची लवादाने प्रामुख्याने दखल घेतली. या कागदपत्रांतून मोटारसायकल चालकाच्या चुकीमुळेच अपघात झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे लवादाने म्हटले. याशिवाय मृत्यू झाला त्या वेळी झोरे यांचे वय काय होते, त्यांचा असा अपघाती मृत्यू झाला नसता

तर त्यांनी भविष्यात किती वेतन कमावले असते, त्यांच्या जाण्यामुळे त्यांच्या जोडीदाराला होणाऱ्या नुकसानाचे काय आणि अंत्यसंस्काराचा खर्च या बाबीही लवादाने विचारात घेतल्या.

लवादाने झोरे यांच्या कुटुंबीयांना ७५.६० लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करताना दावा दाखल केल्याच्या दिवसापासून म्हणजेच ७ ऑक्टोबर २०१३ पासून नुकसानभरपाईवरील ७.५ टक्के व्याज देण्याचे आदेश दिले. नुकसानभरपाईच्या रकमेपैकी ३७.६० लाख रुपये झोरे यांच्या पत्नीला सव्याज आणि दोन्ही मुलांना प्रत्येकी १८.७५ लाख रुपये सव्याज देण्याचे आदेश दिले. मुलांच्या वाटेला येणारी रक्कम राष्ट्रीय बँकेत मुदत ठेवींच्या स्वरूपात ठेवण्याचेही लवादाने स्पष्ट केले.