राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बदनामीप्रकरणी जामीन

मुंबई : पत्रकार गौरी लंकेश हत्येशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संबंध असल्याच्या वक्तव्यप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात मुंबईच्या माझगाव-शिवडी महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर अब्रुनुकसानीचा खटला चालवण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांने दाखल केलेल्या तक्रारीप्रकरणी राहुल यांनी आपण निर्दोष असल्याचा दावा केला. न्यायालयाने राहुल यांना १५ हजार रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर करत खटल्याच्या सुनावणीला कायमस्वरूपी अनुपस्थित राहण्याची परवानगीही दिली.

महाराष्ट्रात राहुल यांच्यावर दाखल करण्यात आलेले अब्रुनुकसानीचे हे दुसरे प्रकरण आहे. भिवंडी येथेही त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांने अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. राहुल यांच्यासह माकप नेते सीताराम येचुरी यांच्यावरही हा खटला चालवण्यात येणार असून त्यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

कर्नाटक येथील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संबंध असल्याचे वक्तव्य राहुल आणि येचुरी यांनी केले होते, असा आरोप करत या दोघांसह काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरोधात संघाचे कार्यकर्ते आणि पेशाने वकील असलेल्या धृतिमन जोशी यांनी तक्रार केली होती. तसेच अब्रुनुकसानीच्या कारवाईची मागणी केली होती. वैयक्तिक वक्तव्यासाठी पक्षावर कारवाई केली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत शिवडी महानगर दंडाधिकाऱ्यांनी सोनिया गांधी यांचे नाव वगळले होते. तर  राहुल आणि येचुरी यांना फेब्रुवारी महिन्यात समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार राहुल आणि येचुरी हे दोघेही गुरुवारी सकाळी ११च्या सुमारास शिवडी महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर झाले. महानगर दंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांनी राहुल आणि येचुरी यांना पुढे बोलावले. तसेच त्यांना जोशी यांनी केलेली तक्रार वाचून दाखवली आणि आरोप त्यांना मान्य आहेत की नाही, अशी विचारणा केली. त्यावर दोघांनीही हे आरोप आपल्याला मान्य नाहीत आणि आपण निर्दोष असल्याचे  सांगितले. दोघांनी आरोप अमान्य केल्याने त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला चालवण्यात येणार आहे.

राजीनामा मागे घ्या; कार्यकर्त्यांच्या घोषणा

राहुल शिवडी न्यायालयात येणार असल्याने मोठय़ा प्रमाणात काँग्रेस कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या परिसरात गर्दी केली होती. ठरल्या वेळेत राहुल कडेकोट बंदोबस्तात न्यायालयाच्या आवारात दाखल झाले. त्यांना पाहताच राजीनामा मागे घ्या, अशा घोषणा देण्यास कार्यकर्त्यांनी सुरुवात केली.