चेंबूरमधील ‘एम’ वॉर्ड परिसरातील महिलांवर उघडय़ावर शौचास जाण्याची वेळ

मुंबई हागणदारीमुक्त असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा फोल ठरला असून देशाच्या आर्थिक राजधानीत अजूनही रहिवाशांना उघडय़ावर शौचास जावे लागत आहे. चेंबूर परिसरात शौचालयांचा अभाव असल्याने या महिलांना उघडय़ावर शौचास जावे लागते. मुंबईसारख्या शहरात अशी परिस्थिती असताना आम्ही स्वत:ला ‘लाभार्थी’ का म्हणावे, असा प्रश्न या महिलांनी उपस्थित केला आहे.

‘एम’ वॉर्ड परिसरात अनेक वस्तींमधील शौचालयांची परिस्थिती खराब असून सुमारे ५००० लोकसंख्येच्या वस्तीमध्ये २० शौचकूप उपलब्ध आहेत. या शौचालयांमध्ये वीज, पाणी यांची सुविधा नसल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अनेक शौचालयांना दारे नसल्याने त्यांचा वापर करता येत नाही. अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याची ‘एम’ वॉर्डच्या नागरिकांनी नगरसेवकांकडे विचारणा केली होती. मात्र गेल्या अनेक वर्षांत यावर काहीच उपाययोजना झाली नाही, असा आरोप या भागातील महिलांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी नगरसेवकांकडे शौचालय तुंबल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र निधी आला नसल्याचे कारण सांगून नगरसेवकांनी दुर्लक्ष केले, अशी खंत एम वॉर्डातील भारती लोखंडे यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिक विविध योजनांचे ‘लाभार्थी’ असल्याची जाहिरात सध्या दाखवली जात आहे. मात्र उघडय़ावर शौचास जावे लागत असताना आम्ही ‘लाभार्थी’ कसे, असा प्रश्न चेंबूरच्या उषा देशमुख यांनी केला आहे. या परिसरातील अनेक महिला कचरा वेचण्याचे काम करतात. यासाठी त्यांना सकाळी लवकर घराबाहेर पडावे लागते.

मात्र शौचालये तुंबलेल्या स्थितीत असल्याने या महिलांना उघडय़ावर रेल्वे स्थानकाजवळ शौचास जावे लागते, तेथे अनेकदा त्यांच्यासोबत छेडछाडीच्या घटना घडल्या आहेत, असे अंजूम शेख या तरुणीने सांगितले.

शौचालय हा कायम दुर्लक्षित विषय राहिला आहे. मुंबईत विविध विभागांकडून शौचालये बांधली जातात. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत शौचालयांची संख्या अतिशय कमी आहे. शौचालयांची संख्या, लोकसंख्येच्या तुलनेत आवश्यकता याची माहिती पालिकेकडे उपलब्ध नाही. मुख्यमंत्र्यांनी मुंबई हागणदारीमुक्त असल्याची घोषणा केली असली तरी परिस्थिती वेगळी आहे. मुख्यमंत्र्यांना सत्य परिस्थिती कळावी यासाठी येत्या शौचालय दिनानिमित्ताने मुंबईतील शौचालयाच्या अभावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे छायाचित्र मुख्यमंत्र्यांना भेट देणार आहोत.

– सुप्रिया सोनार, राइट टू पी

उघडय़ावर शौचास जाणे मूलभूत अधिकारांची पायमल्ली तर आहेच, मात्र यातून अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. यातून संसर्ग होऊन पोटाचे आजार उद्भवण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी माश्यांचा प्रादुर्भाव वाढीस लागतो व आजार पसरतो.

– डॉ. एल. डी. सामंत